सिमेंटमिक्सर अनियंत्रित
By admin | Published: June 30, 2015 12:39 AM2015-06-30T00:39:20+5:302015-06-30T00:39:20+5:30
अगडबंब सिमेंटमिक्सर ट्रक अचानक उतारावरून खाली येऊन चार दुचाकी आणि एका मोटारीला धडकण्याचा थरार तळजाई टेकडी परिसरात फिरायला जाणाऱ्यांनी रविवारी सायंकाळी अनुभवला.
पुणे : अगडबंब सिमेंटमिक्सर ट्रक अचानक उतारावरून खाली येऊन चार दुचाकी आणि एका मोटारीला धडकण्याचा थरार तळजाई टेकडी परिसरात फिरायला जाणाऱ्यांनी रविवारी सायंकाळी अनुभवला. सुदैवाने या ट्रकचा वेग कमी असल्याने जीवितहानी झाली नाही. मात्र, परिसरातील नागरिकांनी बालंबाल बचावलो, अशी धास्तीयुक्त प्रतिक्रिया व्यक्त केली.
सहकारनगर येथील शिंदे हायस्कूलजवळ कॉँक्रीटच्या रस्त्याचे काम सुरू आहे. यासाठी हा सिमेंट मिक्सर तेथे आणण्यात आला होता. सायंकाळी पाच वाजता उतारावर लावलेला सिमेंटमिक्सर ट्रक अचानक खाली येऊ लागला. रस्त्यावर पार्किंग केलेल्या चार दुचाकी व एका मोटारीला त्याने उडविले. या वाहनांचा अगडबंब सिमेंटमिक्सरमुळे चक्काचूर झाला. समोरून अचानक येणारा सिमेंटमिक्सर पाहून कडेला थांबलेले लोक जीव वाचविण्यासाठी पळाले. त्या वेळी ट्रकमध्ये चालकही नव्हता. सहकारनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी सिमेंटमिक्सर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार, महापालिकेतर्फे तळजाई मंदिराजवळ रस्त्याचे काम सुरू आहे. तेथे आलेला सिमेंट मिक्सरचा चालक चहा पिण्यासाठी समोर असलेल्या टपरीवर गेला. हॅण्ड ब्रेक लावला असा त्याचा समज होऊन तो निघून गेला. मात्र, काही क्षणातच मिक्सर ट्रक उतरावरून खाली आला. दुचाकींना धडक देत खड्ड्यात जाऊन उलटा पडला. त्याआधी एका मोटारीला धडक देऊन नुकसान केले. (प्रतिनिधी)