केंद्र व राज्याने मदत द्यावी
By admin | Published: June 10, 2017 02:21 AM2017-06-10T02:21:18+5:302017-06-10T02:21:18+5:30
पुणेकरांना फसवून भारतीय जनता पार्टीने २४ तास पाणी योजनेसाठी कर्जरोख्यांचा प्रस्ताव मंजूर करून घेतला आहे. काँग्रेसचा
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणेकरांना फसवून भारतीय जनता पार्टीने २४ तास पाणी योजनेसाठी कर्जरोख्यांचा प्रस्ताव मंजूर करून घेतला आहे. काँग्रेसचा या योजनेला कधीही विरोध नव्हता, कर्ज काढण्याला मात्र आहे. संपूर्ण राजकीय सत्ता दिल्यानंतरही पुणेकरांवर भाजपाने हा कर्जाचा बोजा टाकला आहे, अशी टीका काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी या प्रस्तावावरील भाषणात केली.
शिंदे म्हणाले, ‘‘या प्रस्तावात अनेक चुका आहेत. मुख्य म्हणजे त्यात तब्बल २२५ कोटी रुपयांचे, या कामाशी काहीही संबंध नसलेले काम स्थायी समिती, सर्वसाधारण समिती इतकेच काय अधिकाऱ्यांच्याच इस्टिमेट कमिटीची संमती नसताना घुसवण्यात आले आहे. भाजपाला हे चालले हीच मोठी फसवणूक आहे. कर्जाची रक्कम २ हजार २६४ कोटी रुपये आहे, पण विषयपत्रात आयुक्त कुणाल कुमार यांनी त्यापुढे २० टक्के जास्त असे नमूद केले आहे. ही रक्कम ४५० कोटी रुपये आहे. त्याचे आयुक्त काय करणार आहेत ते भाजपाने पुणेकरांना सांगावे.’’
कर्ज काढण्यापूर्वीच आयुक्तांनी हुडको या कंपनीबरोबर कर्ज, व्याजदर यासंबंधी पत्रव्यवहार केला. याबाबत सर्वसाधारण सभा, स्थायी समिती इतकेच काय पण पदाधिकाऱ्यांनाही माहिती दिली नाही. हा अधिकार त्यांना कोणी दिला? हेही भाजपाला चालले. काँग्रेसप्रणीत आघाडी सरकारने महापालिकेला अनेक योजना दिल्या. त्यात ५० टक्के केंद्र, २० टक्के राज्य व ३० टक्के महापालिका अशी आर्थिक विभागणी होती. ही योजना याप्रमाणे करण्यात भाजपाला काय अडचण आहे? गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांनी सत्ता मागितली व पुणेकरांनी त्यांना ती दिली. तरीही त्यांच्या डोक्यावर या ३ हजार कोटी रुपयांच्या कर्जाचा बोजा टाकला गेला आहे.