पुणेकर तरुणाच्या ‘तुर्या’ नाडी परीक्षेला केंद्राची मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:15 AM2021-08-27T04:15:03+5:302021-08-27T04:15:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : काही सेकंदात अचूक नाडीपरीक्षा करून रुग्णाच्या रोगनिदानास मदत करणाऱ्या ‘तुर्या’ या यंत्रास देशाच्या वैज्ञानिक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : काही सेकंदात अचूक नाडीपरीक्षा करून रुग्णाच्या रोगनिदानास मदत करणाऱ्या ‘तुर्या’ या यंत्रास देशाच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन विभाग (डीएसआयआर)ची मान्यता मिळाली आहे. यामुळे या यंत्राचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधन सहकार्याचा आणि प्रसाराचा मार्ग मोकळा झाला आहे. पुण्यातील तरुण संशोधक डॉ. अनिरुद्ध जोशी यांनी हे यंत्र तयार केले आहे.
डॉ. जोशी यांनी मुंबईतून संगणक विषयातले अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केल्यानंतर मुंबई ‘आयआयटी’त या विषयावर एम. टेक आणि पीएच.डी केली. त्याच विषयावर राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत (एनसीएल) येथे ‘पोस्ट डॉक्टरेट’ म्हणजे वरील संशोधनाचे प्रत्यक्ष यंत्र तयार करण्यात रुपांतर केले. या संशोधनाला वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) या राष्ट्रीय संघटनेने मदत केली आहे. डॉ. जोशी यांचे वडील पद्मभूषण सन्मान प्राप्त शास्त्रज्ञ असून त्यांनीच या संशोधनाची कल्पना सुचविली.
डॉ. जोशी यांनी सांगितले की, ज्या तपासण्या करायला सध्या अनेक यंत्रांचा आधार घेतला जातो, त्या तपासण्याचे निष्कर्ष काही सेकंदात डॉक्टरांच्या हाती लागतात. पुण्यातील गेल्या पिढीतील निष्णात नाडीतज्ज्ञ वैद्य अशोक भट यांच्या मार्गदर्शनाखाली हे यंत्र तयार करण्यात आले आहे. सध्या बहुदा प्रत्येक घरात अन्नखर्चापेक्षा औषधखर्चच जास्त असतो. त्याचे कारण आपली सदोष आहारशैली आणि सदोष विहारशैली होय. शरीरात एखादा दोष निर्माण होण्याआधीच जर त्याची काळजी घेतली तर मानसिक ताण, अधिक वजन असे दोष निर्माण होणार नाहीत. अनेक रोगांचे मूळ नाहीसे होईल. त्यामुळे आयुर्वेदातील श्रेष्ठ नाडीपरीक्षा पद्धतीने स्वत:ची प्रकृती स्वत:च तपासून काळजी घेणे ‘तुर्या’मुळे शक्य होणार आहे. या यंत्राद्वारे आपली प्रकृती आपणच घरच्या घरी तपासून त्यांच्या आधारे आहार, निद्रा, व्यायाम निश्चित करता येईल तसेच आवश्यकतेनुसार वैद्यकीय सल्लाही घेता येईल.
चौकट
निरोगी आयुष्यासाठी नाडीपरीक्षा
“दैनंदिनी जीवनात जर आपले ‘वेलबिइंग कोशंट’ (तंदुरुस्ती), ‘डायजेशन कोशंट’ (पचनक्षमता) आणि ‘स्ट्रेस कोशंट’ (तणाव) हे काही क्षणात उपलब्ध झाले तर प्रकृतीचे त्रास आणि आजारपण रोखण्यास त्याचा उपयोग होईल. प्रकृतीतील दोष समजून घेण्याची भारतातील जी प्राचीन आयुर्वेदीय पद्धती आहे, त्यात ‘नाडी परीक्षा’ याला अधिक महत्व आहे. मनगटावरील हाताजवळच्या दोन इंच भागात जाणकार वैद्य तीन बोटे ठेवतात आणि शरीरातील किरकोळ दोष किंवा जुना आजार याचे निदान करतात. त्याची आयुर्वेदीय परिभाषा वात, पित्त आणि कफ अशी आहे तर योगशास्त्रीय परिभाषा सत्व, रज आणि तम अशी आहे. त्यानुसार औषधयोजनाही ठरते आणि योगाभ्यास दिशाही ठरते. गेली सतरा वर्षे यावर संशोधन करून मनगटवरील नाडी बघायच्या तीन जागेवर संगणकीय सेंसर्स ठेवून शरीराची सारी स्थिती दाखवणारे ‘नाडी तरंगिणी’ ही उपकरण केले. त्यासाठी एक लाख रुणांची नाडी तपासून व त्याचे विश्लेषण करून त्याचे प्रमाणीकरण केले.”
-डॉ. अनिरुद्ध जोशी, संशोधक