नारायणगावचे केंद्र हे सर्वोत्तम केव्हीके
By admin | Published: July 6, 2017 02:40 AM2017-07-06T02:40:32+5:302017-07-06T02:40:32+5:30
शेतकऱ्यांना अद्ययावत तंत्रज्ञानाच्या माहितीचा अथांग सागर, गरजेनुरूप राबवत असलेले नावीन्यपूर्ण प्रकल्प, शेतकरी, तरुण आणि कृषी
लोकमत न्यूज नेटवर्क
नारायणगाव : शेतकऱ्यांना अद्ययावत तंत्रज्ञानाच्या माहितीचा अथांग सागर, गरजेनुरूप राबवत असलेले नावीन्यपूर्ण प्रकल्प, शेतकरी, तरुण आणि कृषी पदवीधरांना कृषी उद्योजकतेकडे घेऊन जाण्याकरिता राबवत
असलेले स्तुत्य उपक्रम हे केव्हीकेच्या (कृषी विज्ञान केंद्र) कामकाजाची पोच देऊन जाते, असे मत भारतीय कृषी अनुसंधान
परिषदेचे सहायक महासंचालक (कृषी विस्तार) डॉ. वेदप्रकाश चहल यांनी येथील ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्राला भेटीदरम्यान व्यक्त केले.
या वेळी पुणे येथील अटारी झोन-८ चे संचालक डॉ. लाखनसिंग, कृषी विज्ञान केंद्राचे चेअरमन कृषिरत्न अनिलतात्या मेहेर, केव्हीकेचे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. बी. एस. राजपूत, अटारी झोन-८ पुणेचे शास्त्रज्ञ डॉ. कोळेकर उपस्थित होते.
डॉ. वेदप्रकाश चहल हे भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली येथे सहायक महासंचालक या पदावर कार्यरत आहेत.
भारतातील ६६५ केव्हीकेचा ते कार्यभार संभाळतात. केंद्राचे अध्यक्ष कृषिरत्न अनिलतात्या मेहेर यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या कार्याची माहिती दिली.
डॉ. वेदप्रकाश चहल यांनी केंद्राच्या कार्याची माहिती घेतली. अनिलतात्या मेहेर यांनी स्वागत केले. राहुल घाडगे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. बी. एस. राजपूत यांनी आभार मानले.
विविध प्रकल्पांची पाहणी; वृक्षारोपण केले
डॉ. वेदप्रकाश चहल आणि डॉ. लाखनसिंग यांनी केव्हीकेच्या वसुंधरा फार्म येथे भेट दिली. या वेळी त्यांनी डाळिंब, सीताफळ, पेरू, आंबा या बागांना भेट दिली. तसेच १.५ कोटी लिटरचे शेततळे, समतल चर करून लागवड केलेली आंब्याची बाग, पाणी आणि खत व्यवस्थापन याकरिता केलेली स्वयंचलित सिंचनप्रणाली, पीक प्रात्यक्षिके पाहून ते प्रभावित झाले.
याचबरोबर शेळीपालन, मुक्त गोठा, युरिया ब्रिकेट्स उत्पादन प्रकल्प, डाळ मिल, सोयाबीन प्रक्रिया प्रकल्प, गांडूळ खत यासारख्या प्रकल्पांना भेट देऊन प्रशंसादेखील केली.
डॉ. व्ही. पी. चहल आणि डॉ. लाखनसिंग यांच्या हस्ते वसुंधरा फार्म येथे नारळाचे रोपटे लावून वृक्षारोपण करण्यात आले.