दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर केंद्राने त्वरित काढावा तोडगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2020 04:10 AM2020-12-02T04:10:21+5:302020-12-02T04:10:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : केंद्र शासनाने संसदेत मंजूर केलेल्या तीन विधेयकांमुळे अनेक देशी-विदेशी महाकाय कंपन्या कृषी क्षेत्रात उतरतील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : केंद्र शासनाने संसदेत मंजूर केलेल्या तीन विधेयकांमुळे अनेक देशी-विदेशी महाकाय कंपन्या कृषी क्षेत्रात उतरतील ज्यामुळे शेती, शेतकरी आणि सामान्य जनतेवर विपरीत परिणाम होतील, असे सांगत या विधेयकांना विरोध करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर मंगळवारी (दि. १) मोर्चा काढला.
यावेळी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर केंद्र सरकारने तात्काळ तोडगा काढावा, अन्यथा महाराष्ट्रातही आंदोलनाचा भडका उडेल असा इशारा दिला. ‘स्वाभिमानी’चे प्रकाश बालवडकर, बापूसाहेब कारंडे, ईश्वर गायकवाड, हनुमंत बालवडकर, उमेश सत्रे तसेच स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेचे प्रमुख अमोल हिप्परगे आदी आंदोलनात सहभागी झाले होते.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. “दिल्लीतील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात संघटना राज्यभर रस्त्यावर उतरली आहे. केंद्रातील भाजपा सरकारने काढलेल्या शेतकरीविरोधी तीन अध्यादेशांवर संपूर्ण देशभरात पडसाद उमटत आहेत. शेतकरी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर येऊन आंदोलने करत आहेत. दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर केंद्र सरकारने तात्काळ तोडगा काढावा,” या मागणीचे निवेदन ‘स्वाभिमानी’तर्फे प्रशासनाला देण्यात आले.