प्राचीन मूलभूत शास्त्राच्या अभ्यासासाठी केंद्र
By admin | Published: January 6, 2016 12:52 AM2016-01-06T00:52:53+5:302016-01-06T00:52:53+5:30
प्राचीन भारतीय मूलभूत शास्त्रे आणि तंत्रज्ञान यांचा उगम व विकास यासंबंधींचा अभ्यास करण्यासाठी डेक्कन कॉलेजमध्ये स्वतंत्र केंद्र स्थापन करावे,
पुणे : प्राचीन भारतीय मूलभूत शास्त्रे आणि तंत्रज्ञान यांचा उगम व विकास यासंबंधींचा अभ्यास करण्यासाठी डेक्कन कॉलेजमध्ये स्वतंत्र केंद्र स्थापन करावे, या संदर्भातील प्रस्ताव डेक्कन कॉलेजतर्फे विद्यापीठ अनुदान आयोगाला (यूजीसी) पाठविण्यात आला आहे, असे डेक्कन कॉलेजचे कुलगुरू प्रा. वसंत शिंदे यांनी सांगितले.
संस्कृत ग्रंथांमध्ये ज्ञानाचे भांडार असून, त्याचा समाजासाठी विधायक उपयोग होऊ शकतो, असे नमूद करून शिंदे म्हणाले, की गेल्या काही वर्षांपासून संस्कृत विद्वानांची संख्या कमी होत चालली आहे. मात्र, संस्कृत ग्रंथांच्या आधारे विविध प्रयोग करून समाजाला उपयोगी पडतील अशा वस्तूंवर काम करणारे अनेक अभ्यासक देशभर विखुरलेले आहेत. त्या सर्वांना एकाच छताखाली आणून त्यांच्या पारंपरिक ज्ञानाचा उपयोग समाजाला करून देता येऊ शकतो. त्यासाठी केंद्र व राज्य शासनाने स्वतंत्र केंद्र करण्याबाबत पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे.
प्राचीन तंत्रज्ञान सर्वांना परवडणारे आणि वापरण्यासाठी सोपे आहे. त्यात पाणी शुद्ध कसे करावे अशा अनेक गोष्टींची माहिती आहे. आजही जंगलात राहणाऱ्यांना समाजोपयोगी तंत्रज्ञान अवगत असून, ते सर्वांना उपलब्ध करून देता येऊ शकते. गेल्या काही वर्षांपासून विदर्भात उत्खनन सुरू असून, त्यात सापडलेल्या लोखंडी वस्तूंचा अभ्यास केला असता लोखंडाचा शोध कोरिया किंवा चीनमध्ये नाही तर भारतात लागला असावा,अशी माहिती समोर येत आहेत. (प्रतिनिधी)