'रक्त तुला' करून केंद्र सरकारचा निषेध; पुण्यात दिव्यांग बांधवांचे आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2021 06:24 PM2021-08-27T18:24:56+5:302021-08-27T18:25:07+5:30
दिव्यांगांचे सरकारी नोकरीतील चार टक्के आरक्षण रद्द करण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे.
पुणे : रेल्वे संरक्षण दल, पोलीस दल यातील सरकारी नोकऱ्यांमध्ये दिव्यांगाना देण्यात येणाऱ्या चार टक्के आरक्षणाचा कोटा केंद्र सरकारने रद्द केला आहे. याविरोधात पुण्यात दिव्यांग बांधवांनी आंदोलन करत निर्णय मागे घेण्याची मागणी केली. गांधीगिरी करत काही दिव्यांग बांधवांनी रक्तदान करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची रक्ततुला केली.
दिव्यांगांचे सरकारी नोकरीतील चार टक्के आरक्षण रद्द करण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे. या संदर्भात या संदर्भातील अधिसूचना १८ ऑगस्ट २०२१ रोजी प्रसिद्ध केली आहे. या निर्णयामुळे देशातील लाखो दिव्यांगांना फटका बसणार आहे. दिव्यांगांवर हा अन्याय आहे. आधीच कोरोनामुळे दिव्यांगांचे रोजगार गेले आहेत. उद्योग बुडाले आहेत. सरकारी नोकऱ्यांमधील दिव्यांगांच्या हजारो जागांचा अनुशेष भरलेला नाही.
त्यातच आता आरक्षण रद्द केल्याने लाखो दिव्यांगांवर अन्याय होणार आहे. त्याविरोधात प्रहार अपंग क्रांती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष धर्मेंद्र सातव यांच्या नेतृत्वाखाली रक्त तुला आंदोलन करण्यात आले. दिव्यांग कल्याण उपआयुक्त संजय कदम यांनी आंदोलनस्थळी येऊन निवेदन स्वीकारले. संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष सुरेखा ढवळे, जिल्हा अध्यक्ष सुप्रिया लोखंडे, बाबा पाडुळे, बाळू काळभोर आदी उपस्थित होते.