‘स्मार्ट सिटी’चा निधी देण्यास केंद्राचा नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 10:15 PM2018-03-21T22:15:44+5:302018-03-21T22:15:44+5:30

काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी स्मार्ट सिटीचा पुढील निधी देण्यास केंद्र सरकारने महापालिकेला नकार दिला आहे का ? असा प्रश्न सभेत विचारला. प्रशासनाने त्यावर गुळमुळीत उत्तर दिले.

central government refuse to fund 'Smart City' | ‘स्मार्ट सिटी’चा निधी देण्यास केंद्राचा नकार

‘स्मार्ट सिटी’चा निधी देण्यास केंद्राचा नकार

Next
ठळक मुद्देमागील निधीचा हिशोब नाही: फक्त २० टक्केच निधी खर्च

पुणे: पुणेकरांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेला स्मार्ट सिटी योजनेचा पुढील वर्षाचा निधी देण्यास केंद्र सरकारने महापालिकेला नकार दिला आहे. महापालिका प्रशासनानेच सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ही माहिती दिली. याबाबतचा सविस्तर अहवाल पुढील सभेत सादर करावा, असा आदेश महापौर मुक्ता टिळक यांनी यावेळी दिला.
काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी स्मार्ट सिटीचा पुढील निधी देण्यास केंद्र सरकारने महापालिकेला नकार दिला आहे का ? असा प्रश्न सभेत विचारला. प्रशासनाने त्यावर गुळमुळीत उत्तर दिले. त्यावर शिंदे यांनी केंद्र सरकारचे ते पत्र आपल्याकडे आहे असे सांगितले.ते पत्र वाचून दाखवू का अशी विचारणा केली. त्यांनी पुन्हा एकदा तोच प्रश्न विचारला. तसेच पत्र सर्वसाधारण सभेपासून लपवले गेले असा आरोप करताना अपेक्षेपेक्षा कमी काम झाले असल्याची टीका या पत्रात आहे का असा प्रश्न उपस्थित केला. 
     आयुक्त व स्मार्ट सिटी कंपनीचे संचालक कुणाल कुमार यावेळी उपस्थित होते. मात्र, या प्रश्नांना अतिरिक्त आयुक्त शीतल उगले-तेली यांनी उत्तर दिले. त्या म्हणाल्या,आतापर्यंत दिलेल्या निधीच्या खर्चाची माहिती पाठवल्यानंतर निधी मिळेल, निधी देणार नाही असे कळवण्यात आलेले नाही या प्रकल्पाविषयीच्या कामाची अधिकची माहिती जमा करण्याचे काम सुरू आहे असे त्यांनी सांगितले. शिंदे यांनी त्यावर प्रत्युत्तर करताना आतापर्यंत २० टक्केच निधी खर्च झाला आहे,त्याची माहिती देखील केंद्राकडे पाठविण्यात आली नसल्यामुळे पुन्हा निधी देण्यास नकार मिळाला आहे.आयुक्त कुणाल कुमार यांनीही ते मान्य केले. त्यांनी सांगितले, माहिती पाठवल्यानंतर निधी मिळेल असे सांगत त्यांनी या प्रश्नांवर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

Web Title: central government refuse to fund 'Smart City'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.