केद्रांच्या पथकाचे 'वरातीमागून घोडे' ; तब्बल तीन महिन्यांनंतर अतिवृष्टीच्या नुकसानीची पाहणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2020 11:36 AM2020-12-22T11:36:21+5:302020-12-22T12:02:49+5:30
तीन महिन्यांनंतर पथक दौऱ्यावर येत असल्याने नुकसान झाल्याचे कसे दावणार जिल्हा प्रशासनासमोर पेच
पुणे : राज्यात ऑक्टोबर महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे पुणे विभागात प्रामुख्याने पुणे, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यासाठी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी राज्य शासनाकडे ऐवढा निधी नसल्याने केंद्राकडे निधीची मागणी करण्यात आली होती. यावरून बरेच राजकारण देखील झाले. अखेर केंद्र शासनाने ऑक्टोबर महिन्यांत झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी एक पथक पुणे विभागाच्या दौऱ्यावर पाठवले आहे. तब्बल तीन महिन्यांनंतर हे पथक येत असल्याने नुकसान झालेले नक्की काय दाखविणार असा मोठा प्रश्न जिल्हा प्रशासनासमोर उभा राहिला आहे.
पुणे विभागात 14 ऑक्टोबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे तब्बल 87 हजार 416 हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रावरील शेत पिकांचे नुकसान झाले. यामध्ये सर्वाधिक फटका सोलापूर, पुणे आणि सांगली जिह्याला बसला. मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली. विभागात तब्बल 1 हजार 29 जनावरे पाण्यात वाहून गेली. या सर्व नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक पुणे विभागाच्या दौऱ्यावर आले आहे. बुधवार दि.23 रोजी हे पथक पुणे जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून विभागीय आयुक्त कार्यालयात संपूर्ण विभागाचा आढावा घेणार आहे. पथक तब्बल तीन महिन्यांनंतर येत आहे. नुकसान झालेल्या भागाची शेतकऱ्यांकडून दुरूस्ती, डागडुजी करण्यात आली आहे. यामुळेच प्रशासनासमोर केंद्रीय पथकाला नक्की काय दाखवायचे व त्यावेळी आलेल्या प्रलयाची तीव्रता कशी कळणार प्रश्न निर्माण झाला आहे.