सेंट्रल रेल्वे, शिवशक्ती विजयी
By admin | Published: May 13, 2017 04:49 AM2017-05-13T04:49:07+5:302017-05-13T04:49:07+5:30
सेंट्रल रेल्वे, मुबंई पोर्ट ट्रस्ट संघांनी पुरुष गटात; तर मुबंई उपनगरच्या महात्मा गांधी संघाने संघाने महिला विभागात आपापल्या
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सेंट्रल रेल्वे, मुबंई पोर्ट ट्रस्ट संघांनी पुरुष गटात; तर मुबंई उपनगरच्या महात्मा गांधी संघाने संघाने महिला विभागात आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत विजयी घोडदौड कायम ठेवली.
राज्य व पुणे कबड्डी संघटनेच्या मान्यतेने बाबूराव सणस मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत शुक्रवारी पुरुष विभागात सेंट्रल रेल्वे संघाने युनियन बँकेवर ३८-२५ गुणांनी मात केली. मध्यंतराला सेंट्रल रेल्वेकडे २२-७ गुण अशी आघाडी होती. रोहित पार्टे यांच्या चढाया व सूरज बनसोडे यांनी केलेल्या पकडींमुळे रेल्वे संघाने विजय संपादन केला. युनियन बँकेच्या अजिंक्य कापरे व सिद्धेश तटकरे यांनी चांगला खेळ केला.
मुंबई पोर्ट ट्रस्ट संघाने बीईजी संघावर ३५-१७ असा विजय मिळविला. मध्यंतराला मुंबई पोर्ट ट्रस्ट संघाकडे १७-९ अशी आघाडी घेतली होती. मुंबई पोर्ट ट्रस्टच्या शुभम कुंभार व शिवराज जाधव यांनी आक्रमक खेळ करीत आपल्या संघाला सहज विजय मिळवून दिला. त्यांना संकेत सावंतने काही महत्त्वाच्या पकडी घेऊन चांगली साथ दिली. बीईजीचे विवेक घुले व सुशील कुमार यांनी चांगला खेळ केला.
महिला विभागात मुंबई उपनगरच्या महात्मा गांधी संघाने साताऱ्याच्या शिवाजी उदय मंडळ संघाचा ४५-२ असा धुव्वा उडवून एकतर्फी विजय मिळविला. मध्यंतराला महात्मा गांधी संघाकडे २३-८ अशी भक्कम आघाडी होती. महात्मा गांधी संघाच्या सायली जाधवने केलेला अष्टपैलू खेळ व तिला प्रियंका कुंभार व तेजस्विनी पाटेकर यांनी घेतलेल्या उत्कृष्ट पकडींच्या जोरावर विजय सोपा केला. शिवाजी उदय मंडळाच्या सोनाली दळवी व श्रीवणी गोसावी यांनी केलेल्या जोरदार चढाया व अपूर्वा शिंदे आणि नेनिका भोई यांनी घेतलेल्या पकडी यांमुळे मध्यंतरानंतर काहीशी चुरस निर्माण झाली होती; मात्र संघाच्या विजयासाठी त्यांचे हे प्रयत्न अपुरे ठरले. सोनाली शिंगटे व प्रतीक्षा तांडेले यांनी केलेल्या जोरदार व चौफेर चढायांच्या जोरावर मुंबई उपनगरच्या शिवशक्तीने कोल्हापूरच्या महालक्ष्मी संघावर ६१-१४ अशी मात करून सहज विजय मिळविला. मध्यंतराला शिवशक्ती संघाकडे ३०-११ अशी आघाडी होती. शिवशक्ती संघाने पहिल्या डावात दोन लोण व चार बोनस घेतले. शिवशक्ती संघाने मध्यांतरानंतरही आक्रमक खेळ करून तीन लोण व चार बोनस गुण मिळवून विजय मिळविला. महालक्ष्मी संघाच्या अमृता सांगळे व स्नेहा शिंदे यांनी चांगला खेळ केला.