पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेला मध्य रेल्वेचा हिरवा कंदील
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2020 06:00 AM2020-02-16T06:00:00+5:302020-02-16T06:00:04+5:30
पुणे-नाशिक रेल्वे मार्गाची चर्चा मागील २० वर्षांहून अधिक काळापासून सुरू आहे. केंद्रीय रेल्वे मंत्रालय व राज्य शासनाकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर रेल्वे मार्गाच्या कामाला सुरूवात
पुणे : मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या पुणे-नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे प्रकल्पाच्या सुधारित आराखड्याला (डीपीआर) मध्य रेल्वेने नुकतीच मान्यता दिली. आता केंद्रीय रेल्वे मंत्रालय व राज्य शासनाकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर रेल्वे मार्गाच्या कामाला सुरूवात होईल, अशी माहिती महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (महारेल) कडून देण्यात आली. मध्य रल्वेने मान्यता दिल्याने या प्रकल्पाचा मार्ग सुकर होणार आहे. कामाला सुरूवात झाल्यानंतर पुढील साडे तीन वर्षात काम पूर्ण होईल.
पुणे-नाशिक रेल्वे मार्गाची चर्चा मागील २० वर्षांहून अधिक काळापासून सुरू आहे. तत्कालीन रेल्वेमंत्री लालुप्रसाद यादव यांनी पहिल्यांदा या मार्गाच्या सर्वेक्षणासाठी रेल्वे अर्थसंकल्पात तरतुद केली. त्यानंतर सातत्याने सर्वेक्षणाचीच चर्चा होत राहिली. अवाढव्य खर्च आणि जागा देण्यात होत असलेल्या विरोधामुळे या मार्गाबाबत शासनासह रेल्वेनेही कानाडोळा गेला. सुरूवातीला झालेल्या सर्वेक्षणाचा मार्ग बदलण्यात आला. त्यानंतर पुन्हा हडपसर, मांजरी, वाघोली, आंळदी, चाकण या मार्गाचे सर्वेक्षण करून त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानंतर सप्टेंबर २०१८ मध्ये महारेलची स्थापना झाल्यानंतर हा प्रकल्प हस्तांतरीत करण्यात आला. त्यांच्याकडून प्रकल्पाचा ‘डीपीआर’ तयार करून मध्य रेल्वेकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला होता. त्यावर रेल्वेकडून दि. १० फेब्रुवारीला अंतिम मोहोर उमटविण्यात आली. केंद्रीय रेल्वे मंत्रालय व राज्य शासनाकडे डीपीआर मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे. त्यांनी मान्यता दिल्यानंतर या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामास सुरूवात होईल, असे ‘महारेल’कडून सांगण्यात आले.
दरम्यान, सध्या पुण्याहून नाशिक जाण्यासाठी किमान पाच तास लागतात. या प्रकल्पामुळे ही वेळ तीन तासांनी कमी होणार आहे. या मार्गावर २४ स्थानके प्रस्तावित असली तरी हाय स्पीड ट्रेन काही ठराविक थांब्यांवरच थांबेल. सध्या सहा ट्रेन प्रस्तावित असून प्रत्येकी ४५० प्रवासी क्षमता असेल. या गाड्यांमार्फत दिवसभरात एकुण ४८ फेºया होतील. सुरूवातीला या गाडीचा वेग ताशी २०० किमी राहणार असून भविष्यात २५० किमीपर्यंत वाढविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. महारेलकडून राज्य शासनाच्या मदतीने चाकण, राजगुरूनगर, संगमनेर, नाशिक येथे मल्टीमोडल हब उभारण्याचेही प्रस्तावित आहे.
--------------
हायस्पीड मार्गाची वैशिष्ट्य -
- प्रकल्पाचा अंदाजित खर्च - १६,०३९ कोटी
- राज्य व रेल्वे मंत्रालयाचा हिस्सा - प्रत्येकी ३,२०८ कोटी, बँक कर्ज - ९,६२४ कोटी
- वेग ताशी २०० किमी
- लांबी - २३५.१५ किमी
- प्रवासाचा कालावधी - २ तास
- मोठे थांबे ८, छोटे थांबे १६
- रस्ते उड्डाणपुल -४१, पुलाखालील मार्ग - १२८
- बोगदे - १८ (लांबी २१.६८ किमी, सर्वात लांबीचा बोगदा - ६.६४ किमी)
- प्रकल्प पुर्णत्वाचा कालावधी - १२०० दिवस
--------------
प्रस्तावित थांबे - पुणे, हडपसर, मांजरी, कोलवडी, वाघोली, आळंदी, चाकण, राजगुरूनगर, भोरवडी, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, बोटा, जांबुत, साकूर, अंबोरे, संगमनेर, देवठाण, चास, दोडी, सिन्नर, मुढारी, शिंदे आणि नाशिक.
------------
पुणे-नाशिक मधील औद्योगिक क्षेत्र - पिंपरी चिंचवड, चाकण, खेड सेझ, रांजणगाव, सिन्नर, नाशिक.