केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाची तुकडी शहरात दाखल; शहरात काढणार 'रुट मार्च'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 11:07 PM2020-05-14T23:07:46+5:302020-05-14T23:08:22+5:30
लॉकडाऊन तसेच आगामी काळात येणारा रमजान ईद या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडल्यास खबरदारीचा उपाय
पुणे : लॉकडाऊन तसेच आगामी काळात येणारा रमजान ईद या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेसाठी राज्याने केंद्रीय सशस्त्र दलाच्या २० कंपन्यांची मागणी केली होती. त्या मागणीनुसार केंद्र सरकारकडूनपुणे शहरासाठी केंद्रीय सशस्त्र दलाची एक कंपनी पुण्यात बुधवारी रात्री दाखल झाली आहे. या कंपनीत १० अधिकारी व ११० जवान असून त्यांची एका महाविद्यालयात बुधवारी रात्री सोय करण्यात आली होती. मात्र, या सुविधेविषयी त्यांनी नाराजीव्यक्त केल्यानंतर त्यांना दुसरीकडे व्यवस्था करण्यात येत आहे. लॉकडाऊनमध्ये गेल्या ५३ हून अधिक दिवस शहर पोलीस २४ तास रस्त्यावर बंदोबस्त करीत आहेत. त्यात शहरात आतापर्यंत २१ पोलीस कर्मचार्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्यांच्याशी संपर्कात आलेल्या इतर कर्मचार्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्याचवेळी शहरातील कोरोनाच्या रुग्णात मोठी वाढ होत आहे. अशावेळी कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडल्यास खबरदारीचा उपाय म्हणून या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या कंपनीचा उपयोग करण्यात येणार आहे. त्यासाठी शहरातील पाचही परिमंडळात त्यांचा मार्च काढण्यात येणार आहे. त्यादृष्टीने संबंधित परिमंडळाच्या पोलीस उपायुक्तांच्या सहकार्याने हा रुट मार्च काढण्यात येणार आहे. गुरुवारी शहरातील प्रतिबंधित भागाच्या बाहेरुन असा रुट मार्च काढण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, दुपारनंतर अचानक आलेल्या पावसामुळे हा मार्च काढण्यात आला नसल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी सांगितले.