बर्ड फ्लू पाहणीसाठी केंद्रीय पथक जिल्ह्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:13 AM2021-01-19T04:13:04+5:302021-01-19T04:13:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ‘बर्ड फ्लू’ची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पशुसंवर्धन विभागातील पथक पुण्यात आले आहे. त्यांनी सोमवारी (दि. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ‘बर्ड फ्लू’ची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पशुसंवर्धन विभागातील पथक पुण्यात आले आहे. त्यांनी सोमवारी (दि. १८) मुळशीतील नांदे गावात जाऊन पाहणी केली. कावळ्यांपासून या आजाराची लागण होत असून, पोल्ट्री बंदिस्त असल्याने तिथे फारसा धोका नाही. मात्र, काळजी घेण्यास सांगण्यात आले आहे.
जानेवारीमध्ये आतापर्यंत राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात तब्बल ५ हजार ९८७ निरनिराळ्या पक्ष्यांच्या अचानक मरण्याची नोंद झाली. मृत पक्ष्यांचे नमुने भोपाळ येथील राष्ट्रीय, तसेच पुण्यातील विभागीय प्रयोग शाळेत पाठविण्यात आले आहेत.
सुरुवातीला ५ जिल्ह्यांतच आढळलेल्या या आजाराचा प्रादुर्भाव आता सगळीकडे दिसू लागला आहे. दोन्ही प्रयोगशाळांच्या निष्कर्षानुसार परभणी (कुपटा, व पेडगाव), लातूर (तोंदर वंजारवाडी, कुर्दाडी) नांदेड (पापलवाडी, नावान्द्यांची वाडी), पुणे (चांदे, बेरीबेल), सोलापूर (मंगळवेढा), बीड, (लोखंडी सावरगाव), अहमदनगर( श्रीगोंदे), रायगड (पेण) या सात जिल्ह्यातील कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे झाल्याचे दिसले आहे.
त्यामुळेच केंद्रीय पथकाने त्वरेने पुणे जिल्ह्यास भेट देऊन पाहणी केली. केंद्राने दिलेल्या निर्देशानुसार, या ठिकाणाच्या १ किलोमीटर परिघातील सर्व पोल्ट्रीतील, तसेच पाळीव कोंबड्याही नष्ट करण्यात आल्या आहेत. सरकारच्या वतीने अशा नष्ट केलेल्या प्रत्येक लहान कोंबडीस २० रुपये देण्यात येतात. त्यामुळे पंचनामा करून ही कार्यवाही झाली.
पशुसंवर्धन खात्यातील सूत्रांनी सांगितले की, बर्ड फ्लूचा आजार कावळ्यांच्या विष्ठेतून होत असल्याचा निष्कर्ष आहे. अन्य पक्ष्यांमध्ये याचा सहज संसर्ग होऊन ते पक्षी अचानक मृत होत आहेत. पोल्ट्रीतील कोंबड्यांच्या संपर्कात अशा कावळ्यांची विष्ठा किंवा थेट संपर्क आला, तरच प्रादुर्भाव होईल. त्यामुळे पोल्ट्री चालकांनी पोल्ट्री बंदिस्त ठेवावी. कावळे किंवा अन्य पक्ष्यांचा त्यांच्याशी संपर्क होणार नाही याची काळजी घ्यावी.
चौकट
“मृत पक्ष्यांचा नमुना पॉझेटिव्ह आल्यानंतर तर सर्व काळजी घेतली जात आहे. निर्जंतुकीकरण, पक्षी बंदिस्त ठेवणे, त्यांच्या संपर्क इतर पक्ष्यांशी येऊ न देणे अशा सूचना पोल्ट्री चालकांना देण्यात आल्या आहेत.”
-सचिंद्र प्रताप सिंग, आयुक्त, पशुसंवर्धन