सिंहगड रस्त्यावरील 'कोविड केअर सेंटर' ची केंद्रीय पथकाकडून पाहणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 02:48 PM2020-04-21T14:48:33+5:302020-04-21T14:52:56+5:30
सध्या या ठिकाणी ११ कोरोना बाधित रुग्ण असून ३० जणांना 'विलगीकरण कक्षा'त ठेवण्यात आले आहे.
पुणे : शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. रोज पन्नास ते सत्तरच्या दरम्यान नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे. त्या पार्श्वभूमीवर जवळपास सर्वच शहर सील करण्यात आले असून २७ एप्रिलपर्यंत अगदी काटेकोरपणे संचारबंदीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. तसेच प्रशासनाकडून देखील शहरातील रुग्णालयात असणाऱ्या वैद्यकीय यंत्रणांबाबत देखील तितकीच पुरेसी काळजी घेतली जात आहे. कोरोनाचे संकट अधिक गडद होताना दिसत आहे.त्याचधर्तीवर केंद्रीय पथकाकडून वडगाव खुर्द येथील राजयोग सोसायटी परिसरात असलेल्या पुणे महानगरपालिकेच्या कै. मुरलीधर पांडुरंग लायगुडे दवाखान्याची पाहणी आज (दि. २१) करण्यात आली. यावेळी महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड, आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे, लायगुडे दवाखान्याच्या डॉ. शुभांगी शाह, औषध निर्माण अधिकारी कल्पेश घोलप उपस्थित होते.
कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी महापालिका प्रशासनाने सुरुवातीला येथे 'विलगीकरण कक्ष' स्थापन केला. परदेशातून आलेले अथवा दिल्लीवरून आलेल्या संशयितांना १४ दिवसांसाठी ठेवण्यात येत होते. सध्या वाढते रुग्ण लक्षात घेता या ठिकाणी कोविड केअर सेंटरची स्थापना करण्यात आली. या ठिकाणी संशयित रुग्णांच्या घशाचा द्राव (स्वॅब) घेऊन चाचणीही केली जाते. सध्या या ठिकाणी ११ कोरोना बाधित रुग्ण असून ३० जणांना 'विलगीकरण कक्षा'त ठेवण्यात आले आहे. दोन बेडच्या मध्ये किती अंतर ठेवण्यात येते, तसेच कोरोना बाधित रुग्ण आढळल्यास त्याच्यावर कोणत्या पद्धतीने उपचार करण्यात येतात, निगेटिव्ह रुग्ण आल्यास काय करता, दवाखान्यात किती बेडची व्यवस्था करण्यात आली आहे, आदी प्रश्नाबाबत केंद्रीय पथकाने माहिती घेतली.