कात्रजच्या उड्डाणपुलासाठी केंद्रीय झू अथॉरोटी ने दिली मंजुरी: प्रकाश जावडेकर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 08:50 PM2019-08-13T20:50:26+5:302019-08-13T20:50:52+5:30
कात्रजमधील वाहतूक समस्येवर तोडगा काढण्यासाठी कात्रज चौकात उड्डाणपूल उभारणे आवश्यक आहे..
कात्रज: कात्रज मधील वाहतूक समस्येवर तोडगा काढण्यासाठी कात्रज चौकात उड्डाणपूल उभारणे आवश्यक आहे. यासाठी केंद्रीय झू ऑथोरिटीकडून राजीव गांधी प्राणी संग्रहालयमध्ये उड्डाण पुलाचा खांब उभारण्यासाठी मंजुरी मिळाली असून त्याचे काम लवकर सुरू होईल.असे मत केंद्रीय पर्यावरण मंत्री जावडेकर यांनी व्यक्त केले.
कात्रजमधील श्रीमंत नानासाहेब पेशवे जलाशयमध्ये आजूबाजूच्या मांगडेवाडी, गुजर-निंबाळकर वाडी,भिलारे वाडी या ग्रामपंचायतमधून निर्माण होणारे सांडपाणी मिसळत असल्याने संपूर्ण उपलब्ध पाणीसाठा दूषित झाला आहे.यासाठी पुणे महानगर पालिकेकडून १० कोटी रुपये मंजूर करून ग्रामपंचायत मधून जलाशयात येणाऱ्या पाण्याला पर्यायी ड्रेनेजलाईन उभारणीचे काम मंजूर करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे भूमीपूजनाचा कार्यक्रम खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते कात्रजमध्ये नुकतेच पार पडला. या प्रसंगी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, महापौर मुक्ता टिळक, आमदार योगेश टिळेकर, सभागृह नेता श्रीनाथ भिमाले,नगरसेविका रंजना टिळेकर, मनीषा कदम, वृषाली कामठे, विरसेन जगताप, राणी भोसले, राजाभाऊ कदम, व्यंकोजी खोपडे, महेश जाधव उपस्थित होते.
खासदार गिरीश बापट यांनी आपल्या मनोगत मध्ये सांगितले की,कात्रज तलावामध्ये मिसळणारे सांडपाणी याचा विषय नगरसेविका मनीषा कदम यांनी खूप वेळेस माझ्यापर्यंत आणला. मी महानगर पालिकेतील सर्व सभासदांना सांगून तो मार्गी लावून दिला,कात्रज मध्ये नवीन पोस्ट ऑफिस,नागरिकांसाठी क्रीडा संकुल,योग साधना केंद्र,महिला उद्योजकता विकास केंद्र अशी विविध विकास कामे मनीषा कदम यांनी उभारणीचे काम चालू केले आहे.एक महिला असून मोठ्या धडाडीने त्या काम करत आहेत त्यांना कुठल्याही प्रकारे निधी कमी पडू देणार नाही. कार्यक्रमास कात्रजच्या आजूबाजूच्या ग्रामपंचायत मधील नागरिक मोठ्या प्रमाणात आले होते.