जिल्ह्यातील जटा निर्मूलनाची ‘शंभरी ’
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2019 04:09 PM2019-04-10T16:09:28+5:302019-04-10T16:23:44+5:30
गेल्या चार वर्षांपासून नंदिनी जाधव यांच्या प्रयत्नातून ही जट निर्मूलनाची मोहीम सुरू आहे...
पुणे : दोन वर्षांपूर्वी डोक्यामध्ये गुंता झाला होता. त्यातून जट वाढत गेली. ही जट काढली तर कुटुंबावर काहीतरी अनिष्ट ओढवेल अशी भीती घालण्यात आली होती. पण जट असतानाही पतीचे निधन झाले. त्यातून जट आणि इतर बाबींचा काहीही संबंध नाही, हे कळल्यामुळे जट काढण्याचा निर्णय घेतला. आता डोकं हलके झाल्यासारखे वाटतंय..या भावना आहेत, भोर येथे वास्तवास असलेल्या जनाबाई तारू यांच्या. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जिल्हा कार्याध्यक्ष नंदिनी जाधव यांनी तारू यांची जट कापून जिल्हयातील जट निर्मूलनाची शंभरी गाठली.
गेल्या चार वर्षांपासून नंदिनी जाधव यांच्या प्रयत्नातून ही जट निर्मूलनाची मोहीम सुरू आहे. जाधव यांनी राज्यातील सुमारे 108 महिलांची जटेतून मुक्तत्ता केली आहे. जिल्ह्यातील हा आकडा शंभरावर पोचला आहे. यासंदर्भात जाधव म्हणाल्या, जट काढली तर कुटुंबातील व्यक्तींवर वाईट प्रसंग येईल, अशी भीती तारू यांना दाखविण्यात आली. गेल्या 2 वर्षांपासून त्यांच्या केसांतील ही सुमारे अर्धा किलो वजनाची जट त्यांनी आजवर काढली नव्हती. मात्र आम्ही गेल्या काही दिवसांपासून तारू यांचे समुपदेशन करीत होतो. जट असताना देखील त्यांच्या पतीचे एका महिन्यापूर्वी निधन झाले. त्यामुळे जट आणि इतर कोणत्या बाबींचा संबंध नाही, असे त्यांना वाटू लागले. आम्ही देखील त्यांची भीती कमी केली. त्यातून त्या जट काढण्यास तयार झाल्या'.
दोन वर्षांपासून डोक्यावर बाळगलेले हे ओझे उतरल्याचा आनंद तारू यांच्या चेह-यावर दिसत होता. त्या म्हणाल्या, ही जट देवीची आहे. ती काढू नकोस, असे मला अनेकांनी सांगितले. त्यामुळे जट काढायला मला भीती वाटायची. नंदिनी जाधव जट काढण्याचे काम करीत असल्याचे मला वृत्तपत्रांच्या माध्यमातून समजले आणि मी त्यांच्याशी संपर्क केला. अखेरीस त्यांच्या मदतीने माझी जट काढण्यात आली. माझ्याप्रमाणे इतर महिलांनी देखील जट काढावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.