‘विशेष’ अनुदानाच्या आश्वासनाचा ‘सीईओं’ना विसर
By admin | Published: February 23, 2016 03:10 AM2016-02-23T03:10:01+5:302016-02-23T03:10:01+5:30
विशेष मुलींची संख्या असूनही त्या मुलींचे होणारे नीटनेटके संगोपन संस्थेतील स्वच्छता पाहून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप यांनी दोनच दिवसांत संस्थेचे अनुदान
शिरूर : विशेष मुलींची संख्या असूनही त्या मुलींचे होणारे नीटनेटके संगोपन संस्थेतील स्वच्छता पाहून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप यांनी दोनच दिवसांत संस्थेचे अनुदान देण्यात सांगतो, असे आश्वस्त केले. मात्र, या आश्वासनाला अडीच महिने लोटूनही संस्थेला अद्याप त्यांचे उर्वरित अनुदान मिळालेले नाही. या वर्षाचेही अनुदान न मिळाल्याने उमाप यांनी ‘देवदूत’ म्हणून संबोधलेले कर्मचारी मात्र पगारापासून वंचित आहेत.
येथील शासकीय विशेष मुलींचे वसतिगृहाला उमाप यांनी १ डिसेंबर २०१५ रोजी भेट दिली होती. कर्मोलोदया ही संस्था हे वसतिगृह चालवते. मानसिक व शारीरिक अपंगत्व असलेल्या ५२ मुली या वसतिगृहात आहेत. कर्मोलोदयाने गेल्या १८ वर्षांत या मुलींच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवला आहे. त्याची चुणूक उमाप यांना दिसली. विशेष मुलींच्या बँडपथकाने प्रवेशद्वारातच उमाप यांना सलामी दिली. वसतिगृहात प्रवेश केल्यावर मुलींनी फुलवलेले उद्यान, वसतिगृहातील स्वच्छता आदींनी त्यांना आश्चर्यचकित केले. स्वच्छता, नीटनेटकेपणा, शिस्त तेही ‘विशेष’ मुलींमध्ये पाहून संस्थेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना, ‘तुम्ही खूप चांगले काम करीत आहात. तुम्ही देवदूत आहात,’ असे संबोधले.
उमाप यांनी त्या दिवशी संस्थेच्या अधीक्षिका सिस्टर सुमा व सिस्टर सुना यांच्याकडून सर्व माहिती घेतली. अनुदान वेळेवर मिळत नसल्याची तक्रार त्यांनी उमाप यांच्याकडे केली. नोव्हेंबरमध्ये या सिस्टरनी उमाप यांची जिल्हा परिषदेत भेट घेतली होती. यावर उमाप यांनी दखल घेतल्याने ६० टक्के अनुदान संस्थेला मिळाले होते. उर्वरित ४० टक्के डिसेंबरअखेर देण्याचे संबंधित विभागाने कबूल केले होते. मात्र, भेटीनंतर दोन दिवसांतच उर्वरित ४० टक्के देण्यास सांगतो, असे ठामपणे अधीक्षकांना सांगितले होते. दरम्यान प्राप्त माहितीनुसार, हे ४० टक्के अनुदान अद्याप संस्थेला मिळालेले नाही.
या वर्षाचे (एप्रिल २०१५पासून)देखील अनुदान मिळालेले नाही. अधिकारी वर्ग त्रास देईल म्हणून संस्थेचे अधिकारी-कर्मचारी याबाबत सांगताना कचरतात. मात्र, संस्थेला सातत्याने मदत करणाऱ्या काही मंडळींकडून ही माहिती मिळाली. (वार्ताहर)