सोमवारीपासून सीईटी परीक्षेला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:12 AM2021-09-19T04:12:05+5:302021-09-19T04:12:05+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीचा फटका शिक्षण क्षेत्राला बसला आहे, तसेच पालकांनासुद्धा आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असल्याने विद्यार्थ्यांना ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीचा फटका शिक्षण क्षेत्राला बसला आहे, तसेच पालकांनासुद्धा आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असल्याने विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेऊन देणेही अनेक पालकांना शक्य होत नाही. त्यातच गेल्या वर्षाच्या तुलनेत अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र व कृषी या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या तब्बल १ लाखाने घटली आहे. त्यामुळे इयत्ता बारावीचा निकाल चांगला लागला असताना अभियांत्रिकीसह इतर अभ्यासक्रमाच्या काही जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे.
मागील वर्षी ५ लाख ४२ हजार ४३१ विद्यार्थ्यांनी सीईटी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. मात्र, यंदा केवळ ४ लाख २४ हजार ७७३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत यंदा प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या चांगलीच घटणार आहे.
सीईटी परीक्षेसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना संकेतस्थळावरून प्रवेशपत्र (हॉल तिकीट ) काढून घेता येत आहे. अद्याप प्रवेश पत्रक प्राप्त करून न घेतलेल्या विद्यार्थ्यांनी ते तत्काळ प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन ‘सीईटी-सेल’च्या अधिकाऱ्यांनी केले आहे.
---------------------------------
यंदा फार्मसी व कृषी अभ्यासक्रमाचे प्रवेश चांगले होतील. मात्र, अभियांत्रिकी प्रवेशावर मोठा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोना आणि वाढत्या बेरोजगारीमुळे ‘सीईटी’ साठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटली आहे.
- एम. जी. चासकर, अधिष्ठाता, विज्ञान व तंत्रज्ञान विद्या शाखा, सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठ.
-----------------------