हडपसर पोलिस ठाण्यातून पळून गेलेल्या सोनसाखळी चोराला छत्रपती संभाजीनगरमध्ये अटक
By नितीश गोवंडे | Published: July 6, 2024 05:12 PM2024-07-06T17:12:42+5:302024-07-06T17:13:26+5:30
हडपसर भागात पालखी सोहळा आल्यानंतर दर्शनासाठी आलेल्या महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या धुरपता भोसलेला हडपसर पोलिसांनी बुधवारी (दि. ३) अटक केली होती....
पुणे : पालखी सोहळ्यात दर्शन करण्यासाठी आलेल्या महिलांचे दागिने चोरणाऱ्या महिला आरोपीला हडपसर पोलिसांनी अटक केली होती. आरोपी महिलेला हडपसर पोलिस ठाण्यात आणल्यानंतर तिने पोलिसांची नजर चुकवून पोलिस ठाण्यातून पलायन केले होते. पोलिसांनी तिचा शोध घेऊन तिला छत्रपती संभाजीनगर येथून अटक केली. धुरपता अशोक भोसले (३१, रा. टाकळी, ता. सिल्लोड, जि. छ. संभाजीनगर) असे अटक केलेल्या सोनसाखळी चोर महिलेचे नाव आहे.
हडपसर भागात पालखी सोहळा आल्यानंतर दर्शनासाठी आलेल्या महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या धुरपता भोसलेला हडपसर पोलिसांनी बुधवारी (दि. ३) अटक केली होती. तिला तपासासाठी विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या कोठडीतून हडपसर पोलिस ठाण्यात चौकशीसाठी आणले होते. त्यावेळी पोलिसांचे लक्ष चुकवून भोसले हडपसर पोलिस ठाण्यातून पसार झाली होती. या घटनेची माहिती तात्काळ वरिष्ठांना देण्यात आली.
हडपसर पोलिस ठाण्यातील तपास पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी आरोपी धुरपता भोसले रिक्षातून मुंढव्याच्या दिशेने गेल्याचे आढळून आले. त्यानंतर ती नगर रस्ता परिसरात आली. तिथून बसने ती छत्रपती संभाजीनगरकडे गेल्याचा संशय पोलिसांना आला. त्यानंतर पोलिसांचे एक पथक छत्रपती संभाजीनगर येथे रवाना झाले. टाकळी गावातून धुरपता भोसले हिला ताब्यात घेण्यात आले.
ही कारवाई पोलिस उपायुक्त आर. राजा, सहायक आयुक्त अश्विनी राख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पांढरे, पोलिस निरीक्षक निरीक्षक (गुन्हे) मंगल मोढवे, उमेश गिते, सहायक निरीक्षक अर्जुन कुदळे, उपनिरीक्षक महेश कवळे, सुशील लोणकर, संदीप राठोड, सचिन जाधव, ज्योतीबा पवार, प्रशांत दुधाळ, निखिल पवार आणि प्रशांत टोणपे यांच्या पथकाने केली.
एका महिला पोलिस शिपायाचे निलंबन..
दरम्यान, अटक केलेल्या आरोपीच्या बाबतीत योग्य ती खबरदारी न बाळगता, बेपर्वा वर्तन केल्यामुळे आरोपीने संधीचा फायदा घेत पळ काढल्याप्रकरणी पोलिस उपायुक्त आर राजा यांनी कर्तव्यात बेजबाबदार व निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवून महिला पोलिस शिपाई ताराबाई गणपत खांडेकर यांना शासकीय सेवेतून निलंबित केले. तसेच त्यामुळे पोलिस दलाची प्रतिमा मलीन झाल्याचे देखील निलंबनाच्या आदेशात म्हटले आहे.