डॉ. सदानंद मोरेंनी दिला साहित्य संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
By श्रीकिशन काळे | Published: September 18, 2023 01:50 PM2023-09-18T13:50:44+5:302023-09-18T13:54:46+5:30
महाराष्ट्र साहित्य मंडळाला 'संचनालया'चे स्वरूप देऊन त्याची स्वायत्तता घालविण्याचा डाव सरकारचा आहे...
पुणे : महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा डॉ. सदानंद मोरे यांनी दिला आहे. साहित्य संस्कृती मंडळाची स्वायत्तता काढून त्याला शासकीय स्वरूप देण्याचा घाट शासन दरबारी होता आहे. त्यामुळे डॉ. मोरे यांनी हा राजीनामा दिला आहे. महाराष्ट्र साहित्य मंडळाला 'संचनालया'चे स्वरूप देऊन त्याची स्वायत्तता घालविण्याचा डाव सरकारचा आहे आणि त्यामुळे त्यांचा निषेध म्हणून हा राजीनामा मोरे यांनी दिला आहे. यापुर्वी देखील मोरे यांनी या पदाचा राजीनामा दिला होता, परंतु नंतर तो मागे घेतला.
दरम्यान, १२ वर्षांपूर्वी सरकारने महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व राज्य मराठी विकास संस्था बंद करून तिसरीच एक नवीन संस्था स्थापण्याचा असाच प्रशासकीय घाट घातला होता. त्याला मराठी भाषा, साहित्य, संस्कृती विश्वाने मोठा एकमुखी विरोध केला होता. भाषा, साहित्य, संस्कृती ही क्षेत्र, शासनाची क्षेत्र नसून, या स्वायत्त क्षेत्रांची स्वायत्तता कायम राहील अशा रीतीने शासनाने टिकवून धरण्याची ती क्षेत्र आहेत.
संबंधित तज्ज्ञ, अभ्यासक, लेखक, विचारवंत, कार्यकर्ते, सेवाभावी संस्था यांची ती कार्यक्षेत्र आहेत. शासनाच्या खात्यांनी , पगारी कर्मचारी, अधिकारी यांनी चालवण्याची वा शासनाने या क्षेत्रातील तज्ज्ञ, अभ्यासक यांचा ती चालवण्याची व सहभाग नाकारून स्वतःच प्रशासनामार्फत चालवून घेण्याची ती क्षेत्र नव्हेत, असे मत साहित्य क्षेत्रातून व्यक्त होत आहे.
शासनाने या क्षेत्रातील स्वायत्ततेला नख लावण्याचा प्रयत्न करू नये व कोणी तो करत असल्यास दक्ष राहून असे प्रयत्न हाणून पाडावे, कारण तसे झाल्यास ते संबंधित क्षेत्राचा प्रचंड विरोध ओढवून घेणारे ठरेल तसेच शासनाच्या प्रतिमेलाही ते बाधा आणणारे ठरेल, हे पुनः एकदा लक्षात आणून देत आहोत, असे मत जेष्ठ साहित्यिक श्रीपाद जोशी यांनी व्यक्त केले आहे.