प्रतिकूलतेतही सृजनाची चैत्रपालवी फुटतेच : डॉ. अरुणा ढेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:09 AM2021-04-19T04:09:40+5:302021-04-19T04:09:40+5:30

पुणे : भोवतालच्या विपरीतावर मात करत, माणसामधील सृजनशक्ती अबाधित आहे आणि सारी प्रतिकूलता असली तरी चैत्रपालवी फुटतेच, याचा ...

Chaitrapalvi of creation bursts even in adversity: Dr. Aruna Dhere | प्रतिकूलतेतही सृजनाची चैत्रपालवी फुटतेच : डॉ. अरुणा ढेरे

प्रतिकूलतेतही सृजनाची चैत्रपालवी फुटतेच : डॉ. अरुणा ढेरे

Next

पुणे : भोवतालच्या विपरीतावर मात करत, माणसामधील सृजनशक्ती अबाधित आहे आणि सारी प्रतिकूलता असली तरी चैत्रपालवी फुटतेच, याचा प्रत्यय संवादसेतू वासंतिक कथाविशेषांकातून मिळतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांनी येथे केले.

'संवादसेतू ' आयोजित वासंतिक कथास्पर्धा पारितेषिक वितरण आणि कथाविशेषांक प्रकाशन समारंभात त्या अध्यक्ष म्हणून बोलत होत्या. कोरोना संसर्ग संकटामुळे आभासी स्वरुपात हा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी उपस्थित होते.

डॉ. ढेरे म्हणाल्या की, मराठी साहित्य क्षेत्रात कथालेखनाची सुदीर्घ परंपरा आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने आजच्या नव्या, ताज्या पिढीतल्या नवलेखकांना एक नवे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. 'आपण लिहू शकतो का?' हे आजमावण्याची ही संधी होती आणि लिहिते हात शोधण्याचा आयोजकांचा प्रयत्न, दाद द्यावी, असा आहे.

प्रा. मिलिंद जोशी म्हणाले की, कथा विविधरंगी जीवनाशय मांडत असते. अनुभवाच्या तुकड्याला सर्जनशीलतेची जोड देत, जीवनदर्शन घडवत असते. कथालेखकांच्या भाषा, शैली, मांडणी, संवाद आणि अभिव्यक्ती यातील प्रयोगशीलताही कथेतून समोर येते.

'पुस्तकपेठ' या ग्रंथदालनाचे संजय जोशी यांनी 'उत्तम लेखक उत्तम वाचनातून निर्माण होण्याची शक्यता असते, 'हे सूत्र लक्षात घेऊन स्पर्धा उपक्रमात सहभागी झाल्याचा उल्लेख केला. स्पर्धेचे परीक्षक मधुकर धर्मापूरीकर यांनीही मनोगत व्यक्त केले. 'संवादसेतू 'च्या संपादक डॉ. वंदना बोकील कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. जयश्री बोकील यांनी सूत्रसंचालन केले.

-----------------------

स्पर्धेचा निकाल

पारितोषिक प्राप्त सर्वोत्तम पाच कथा (प्रत्येकी 5 हजार रुपये)

स्वप्निल चव्हाण, कल्याण (कथा-’जांभूळकाळी’, दि.बा. मोकाशी पारितोषिक), सौरभ शामराज, बार्शी, सोलापूर (’किडा’, जी.ए. कुलकर्णी पारितोषिक_), अरुण तीनगोटे, सावंगी, औरंगाबाद (’’निराश पुरुषाच्या दीनचर्येचे काही तुकडे, गंगाधर गाडगीळ पारितोषिक), मिहीर ठकार,पुणे (’गेले द्यायचे राहून’, विद्याधर पुंडलिक पारितोषिक), जयश्री जंगले, ठाणे (रानी की बाव, गौरी देशपांडे, पारितोषिक)

* पारितोषिक प्राप्त दहा लक्षवेधी कथांचे विजेते( 1000 रुपये)

संकेत खेडकर(अहमदनगर) महेश कुलकर्णी (कऱ्हाड), तृप्ती बाळ (पुणे), संग्राम हजारे (जयसिंगपूर), प्रा.अनंता सूर (यवतमाळ), डॉ. प्रेमनाथ रामदासी (माळशिरस, सोलापूर), हीनाकौसर खान-पिंजर(पुणे), उमेश वानखेडे (लिटील रॉक, ए आर), स्वाती वैद्य आणि किशोरी उपाध्ये (पुणे)

-------------------------------------------------------------------------

Web Title: Chaitrapalvi of creation bursts even in adversity: Dr. Aruna Dhere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.