चाकण बसस्थानक बनले बाजारतळ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 02:54 AM2018-08-22T02:54:29+5:302018-08-22T02:54:55+5:30
एसटी बस स्थानकात भाजीविक्रेत्यांनी अतिक्रमण केले असून, बसस्थानकाच्या आवारात, प्रवेशद्वाराजवळ व चक्क फलाटाशेजारी भाजीबाजार भरतोय.
चाकण: येथील एसटी बस स्थानकात भाजीविक्रेत्यांनी अतिक्रमण केले असून, बसस्थानकाच्या आवारात, प्रवेशद्वाराजवळ व चक्क फलाटाशेजारी भाजीबाजार भरतोय. त्यामुळे बसस्थानक प्रवाशांसाठी की भाजी बाजारासाठी, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यातच खासगी गाड्याही स्थानकात उभ्या राहत असल्याने बसगाड्या उभ्या करण्यासाठीच जागा उरत नाही. यामुळे स्थानकात बस आणणार नसल्याच्या इशारा चालकांनी दिला आहे.
चाकण बसस्थानक सर्वांत वर्दळीचे ठिकाण आहे. पुणे-नाशिक मार्गावरील लांब पल्ल्यांच्या गाड्यांचा थांबा या ठिकाणी आहे.
मात्र, स्थानक परिसर आणि आजूबाजूला खासगी व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. यामुळे चालकांना गाड्या आत नेण्यासाठी मार्ग उरत नाही. स्थानकाच्या परिसरात भाजी विक्रेत्यांनी परवानगी नसतानाही ठाण मांडले आहे. यामुळे बसचालकांना गाडी आत नेताना अनेक दिव्य पार करावे लागते.
बांधा-वापरा-हस्तांतरण करा या तत्त्वावर हे बसस्थानक बांधण्यात आले असून, त्यावर कुणाचाही कंट्रोल राहिलेला नाही. मराठा आरक्षण आंदोलनात बस स्थानकाचे कार्यालय काही समाजकंटकांनी जाळल्याने वाहतूक नियंत्रकाला बसायला जागाच नाही.
स्थानकाचे कामकाज बंदच
या जाळपोळीत कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे डीव्हीआर, एलईडी टीव्ही, कार्यालयीन फर्निचर जळून खाक झाले असून, मागील तीन आठवड्यांपासून कार्यालय बंद असून, येथील कामकाज बंद आहे. या कार्यालयाची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी वाहतूक नियंत्रकांकडून होत आहे, मात्र त्यांचे गाºहाणे ऐकायला कोणी तयार नाही.