चाकणमधील गुन्हेगारीला चाप!
By admin | Published: April 25, 2015 05:03 AM2015-04-25T05:03:37+5:302015-04-25T05:03:37+5:30
औद्योगिक भागात सातत्याने गुन्हेगारी कारवाया करणाऱ्या गुंडांवर चाकण पोलिसांनी मोक्काअंतर्गत कारवाई करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे
चाकण : औद्योगिक भागात सातत्याने गुन्हेगारी कारवाया करणाऱ्या गुंडांवर चाकण पोलिसांनी मोक्काअंतर्गत कारवाई करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. तीन गुंडांसह त्यांच्या अन्य साथीदारांवर कारवाईची परवानगी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रितेश कुमार यांच्याकडून घेण्यात आली आहे.
संतोष कांतिलाल गुजर, बबुशा ज्ञानोबा नाणेकर व विशाल कांतिलाल गुजर ( सर्व रा. नाणेकरवाडी, ता.खेड, जि. पुणे ) या तीन गुंडांवर ही मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची परवानगी महानिरीक्षकांनी दिली आहे. नुकतीच गुंड श्याम दाभाडे आणि त्याचे तीन साथीदारांवर कारवाई केल्यानंतर या तिघांवर ही कारवाई होणार असल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे.
एमआयडीसीमधील नेहमीच्या गुन्हेगारी कारवायांच्या पाश्वर्भूमीवर पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मनोज लोहिया यांच्या मार्गदशर्नाखाली अप्पर पोलीस अधीक्षक विजय मगर, उपविभागीय पोलीस अधिकारी संजयकुमार पाटील व चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डी.बी.पाटील यांनी कडक उपाय योजना सुरु केल्या आहेत. त्यामुळेच जिल्ह्याच्या ग्रामीण भागात विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या वरील सर्वाना कारवाईच्या कात्रीत आणण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. चाकण परिसरात प्रमुख सहा गुंडांसह त्यांच्या साथीदारांवर मोक्काखाली कारवाई करण्यात येणार आहे.
चाकण पोलिसांच्या धडक भूमिकेमुळे गुन्हेगारीला चाप बसणार आहे. चाकण पोलिसांनी वरील सर्व गुंडांवर चाकण, शिक्रापूर, देहूरोड, तळेगाव, लोणीकंद आदी जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, लुटमार, आदी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांची माहिती संकलित करून त्यांच्यावर कारवाईची प्रस्ताव चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डी.बी.पाटील यांनी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक रितेशकुमार यांना पाठविला होता . (वार्ताहर)