चाकण एमआयडीसीत सुरक्षा सप्ताह फक्त कागदावरच का?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2020 04:03 PM2020-03-06T16:03:51+5:302020-03-06T17:27:32+5:30
आजपर्यंत बहुतेक कंपनी कामगारांना आपले प्राण गमवावे लागले, तर कित्येक जण जायबंदी झाले आहेत.
- चंद्रकांत मांडेकर
चाकण : उद्योगपंढरीचे नाक असलेली चाकण औद्योगिक वसाहत वाहन उद्योगाची पंढरी म्हणून अल्पावधीत नावारूपास आली आहे. मात्र, औद्योगिक सुरक्षेच्या दृष्टीने फारशी काळजी घेतली जात नसल्याचे आजपर्यंत घडलेल्या अनेक अप्रिय घटनांवरून उघड झाले आहे. आजपर्यंत बहुतेक कामगारांना आपले प्राण गमवावे लागले, तर कित्येक जण जायबंदी झाले आहेत. औद्योगिक सुरक्षा सप्ताह फक्त कागदावरच असल्याचे चित्र एमआयडीसीत पाहावयास मिळत आहे.
चाकण उद्योगपंढरीत सहाशेहून अधिक छोट्या मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्या, औद्योगिक कारखाने आहेत. या सर्वच कारखान्यांत काम करताना सुरक्षितता आवश्यक आहे. आवश्यक त्या ठिकाणी काम करताना हातात हातमोजे, पायात बूट, नाकाला मास्क लावणे आवश्यक आहे. आपण ज्या ठिकाणी काम करतो त्याठिकाणचा परिसर स्वच्छ, टवटवीत आणि सर्वांग सुंदर ठेवण्याची जबाबदारी तेथे काम करीत असलेल्या कामगारांची आहे. कंपनीत काम करताना उत्पादनाचे नुकसान न होता कंपनीत उत्पादन चांगले कसे निघेल, याबद्दल कर्तव्यात कसूर न करता दक्ष राहणे ही काळाची गरज आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील कंपन्यांसह देशी-विदेशी कंपन्या कार्यरत आहेत. यामुळे मोठ्या संख्येने रोजगार निर्मिती झाल्याने उत्पादन प्रक्रिया करताना अंतर्गत सुरक्षेचे नियम पाळले जातात का?कामगारांच्या सुरक्षेसाठी त्यांना पुरेशी साधने उपलब्ध केली जातात का?कौशल्य नसलेला कामगार कंपनीत त्याच्या योग्यतेचे काम करत आहे का? आणि कंपनीच्या अंतर्गत सुरक्षेची काळजी घेतली जाते का ? याची दरवर्षी औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयातर्फे कंपन्यांचे लेखा परीक्षण केले जाते का ? याकडे दुर्लक्ष केले जात असल्यानेच आजपर्यंत अनेक जीवघेण्या अप्रिय घटना घडल्या आहेत.फक्त औद्योगिक वसाहतीमध्ये मोठा गाजावाजा करत औद्योगिक सुरक्षा सप्ताहांतर्गत शून्य अपघात कागदावरच दाखवले जाते आहे.
औद्योगिक वसाहती मोठी असल्याने त्यातून रोजगाराच्या संधीही तेव्हढ्याच प्रमाणात उपलब्ध झाल्या आहेत. मात्र, कंपनीत काम करणाºया कामगारांच्या दृष्टीने शासनाने आखून दिलेल्या नियमांचे पालन होत नसल्याचे चित्र चाकण एमआयडीसीत आजपर्यंत घडलेल्या घटनांवरून स्पष्ट झाले आहे. मागील काही वर्षांत कारखान्यात घडलेल्या घटनांमध्ये अनेकांचा मृत्यू झाला, तर कित्येक जणांना कायमचे अपंगत्व आले आहे. कारखानदारांनी कामगारांच्या सुरक्षेची योग्य काळजी न घेतल्यानेच बहुतांश अपघात घडले असल्याचा कामगार संघटनांचा आरोप आहे. असंघटित कामगारांचा अपघातझाल्यानंतर त्याला कुठल्याही प्रकारची नुकसानभरपाई मिळत तर नाहीच, उलट त्याला रोजगाराही दिला जात नाही.
.........
कामगारांचे प्रबोधन करण्याचा उपक्रम..
आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेची स्थापना ४ मार्च या दिवशी झाली असल्यामुळे ४ ते ११ मार्च या सलग आठ दिवसांच्या कालावधीत औद्योगिक सुरक्षा सप्ताह साजरा केला जातो. कामगारांना त्यांच्या स्वच्छतेसह सुरक्षेचे महत्त्व कळावे, कामगारांमध्ये कामाविषयी आवड निर्माण व्हावी, कौटुंबिक जिव्हाळ्याची नाती तयार होऊन कामगारांमध्ये एकत्रितपणा यावा आणि त्यांच्यात जनजागृती व्हावी, या उद्देशाने कामगारांचे प्रबोधन करण्याकरिता लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात येते.
..............
सुरक्षा नियमांना केराची टोपली...
कंपनी अपघात घडू नये यासाठी योग्य ती दक्षता घेण्याबरोबरच आवश्यक ती साधनसामग्री ठेवण्याबाबत शासनाने नियम ठरवून दिले आहेत,मात्र बऱ्याच कंपन्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे.
कोणताही उद्योग सुरू करण्यासाठी कारखाने अधिनियम१९४८ व महाराष्ट्र कारखाने नियम १९६३ सुरक्षा,आरोग्य कलमांचे पालन करणे बंधनकारक आहे, मात्र या कलमांना केराची टोपली दाखवलेली अनेक कंपन्यांतील पाहणी वरून दिसून येईल.
.......
वर्षाला अंदाजे दोन ते तीन जीवघेण्या घटना
औद्योगिक वसाहतीच्या एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले, की चाकण औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये वर्षाला अंदाजे दोन ते तीन जीवघेण्या घटना घडतात. तसेच कायम अपंगत्व व किरकोळ अपघात घडल्यावर संबंधित कारखान्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतात. कामगारांना सतत सुरक्षेचे प्रशिक्षण व मॉकड्रिल घेतले जाते.