चाकण-शिक्रापूर: दुरुस्तीची मागणी करूनही होतंय दुर्लक्ष; स्थानिकांमध्ये संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2021 05:03 PM2021-09-28T17:03:54+5:302021-09-28T17:14:02+5:30
सध्या पावसाचे पाणी खोल खड्ड्यात साचत आहे. त्यामुळे वाहतुकीदरम्यान चालकांना खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने वाहनांना अपघात होत आहे
शेलपिंपळगाव (पुणे): चाकण - शिक्रापूर राज्यमार्गावर ठिकठिकाणी पडलेल्या धोकादायक खड्ड्यांमुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे. विशेषतः खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचत असल्याने हे खोल खड्डे वाहनचालकांसाठी जीवघेणे ठरत आहेत. एकीकडे रस्ता मेंटेनन्सच्या कामासाठी लाखोंचे ठेके देण्यात येतात. मात्र दुरुस्तीच्या नावाखाली मलमपट्टी केली जात असल्याचे चित्र आहे. स्थानिकांकडून रस्ते दुरुस्तीसंदर्भात वारंवार मागणी करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे. परिणामी स्थानिक तरुणांनी पदर खर्चातून काही ठिकाणचे खड्डे तात्पुरते बुजावले आहेत.
चाकण - शिक्रापूर हा रस्ता जिल्ह्यातील महत्वाच्या तीन आद्योगिक वसाहतींना जोडतो. तसेच मुंबईहून अहमदनगरकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना वाहतुकीच्या दृष्टीने सोयीचे होत असल्याने बहुतांशी वाहनचालक या मार्गाचा अवलंब करत आहेत. औद्योगिक वसाहतींचा कच्चा माल परराज्यातून घेऊन येणारी अनेक मोठी वाहने सातत्याने याठिकाणीहून प्रवास करत असतात. सध्या मात्र रस्त्यावर चौफुला, साबळेवाडी, बहुळ, शेलपिंपळगाव, शेलगाव, भोसे, रासे आदी ठिकाणी खोल खड्डे पडलेले आहेत.
'कात्रजचा खून झाला'... या फ्लेक्समुळे पुण्यात खळबळ
सध्या पावसाचे पाणी खोल खड्ड्यात साचत आहे. त्यामुळे वाहतुकीदरम्यान चालकांना खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने वाहनांना अपघात होत आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने पुढाकार घेऊन रस्त्यावरील धोकादायक खड्डे तत्काळ बुजविण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
चौपदरीकरण कामापूर्वी खड्डे बुजवा...
चाकण - शिक्रापूर राज्यमार्गाच्या चौपदरीकरण कामासाठी नुकताच निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे रस्त्याचे चौपदरीकरण होईल. मात्र या कामाचा शुभारंभ होण्यासाठी किमान तीन - चार महिने कालावधी लागणार आहे. परिणामी चौपदरीकरण कामापूर्वी रस्त्यांवर ठिकठिकाणी पडलेले धोकादायक खड्डे बुजविणे अत्यंत गरजेचे आहे.