चाकण - शिक्रापूर मार्गावर भरधाव ट्रकची बससह तीन वाहनांना धडक; काही जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2021 09:52 PM2021-09-05T21:52:29+5:302021-09-05T21:53:11+5:30
चालकाचा ताबा सुटल्यानं झाला मोठा अपघात.
शेलपिंपळगाव : चाकण - शिक्रापूर राज्यमार्गावर बहुळ (ता. खेड) हद्दीतील धावडदरा माथ्यावर भरधाव अवजड ट्रकच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने मोठा अपघात झाला. अपघातात ट्रकने समोरून येणाऱ्या पीएमपीएलच्या बसला व अन्य तीन चारचाकी कारला धडक दिली. अपघातात बसमधील एका तरुणाच्या शरीरातून एक लोखंडी रॉड आरपार शिरला. सालाबा संभाजी मुंढे (वय २१) असे गंभीर जखमी असलेल्या तरुणाचे नाव आहे. तर अन्य वाहनातील सात ते आठ जण जखमी झाले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा अपघात शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडला. चाकण बाजूकडून शिक्रापूर बाजूकडे भरधाव वेगात निघालेल्या ट्रकने (एमएच ४६ डी एम ८४५२) पीएमपीएमएल बससह चारचाकी कार क्र. एमएच १४ एच यु ५५३१, एमएच ४३ बी यु ३८६५, एमएच २० बीएन ०७८९ या तीन वाहनांना धडक दिली. घटनास्थळी स्थानिकांनी धाव घेऊन अपघातग्रस्त वाहनातील जखमी प्रवाशांना बाहेर काढले. एका चारचाकी वाहनात दोन लहान मुली होत्या, मात्र सुदैवाने त्यांना इजा झाली नाही. मात्र अपघातात पीएमपीएल बसमधील मुंढे नामक तरुणाच्या मांडीतून कंबरेपर्यंत आरपार एक लोखंडी रॉड शिरला.
सदरचा रॉड काढणे शक्य नसल्याने संपूर्ण बस चाकण मधील एका खाजगी रुग्णालयात आणण्यात आली. याठिकाणी लोखंडी कटरच्या साह्याने हा रॉड कापण्यात आला. त्यानंतर तरुणाच्या शरीरातून आरपार झालेला लोखंडी रॉड ऑपरेशन करून काढण्यासाठी त्याला रुग्णालयात रात्री उशिरा दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर सदरचा ट्रक व अन्य वाहने रस्त्यालगतच्या चारीमध्ये पलटी झाली आहेत. रविवारी उशिरापर्यंत अपघातग्रस्त वाहने घटनास्थळी त्याच स्थितीत आहेत.