चाकण एसटी स्थानक अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 01:58 AM2018-10-15T01:58:55+5:302018-10-15T01:59:24+5:30
अडीच महिन्यांपासून समस्या : समाजकंटकांनी केली होती जाळपोळ
चाकण : मराठा मोर्चा आंदोलनातील जाळपोळ व हिंसाचाराला अडीच महिने पूर्ण झाले असून, तेव्हापासून चाकणचे एसटी बसस्थानक अंधारात आहे. बसस्थानकात सर्वत्र अस्वच्छता दिसून येत आहे.
बसस्थानकाची दुरवस्था झाल्याने असून नसल्यासारखे झाले आहे. आंदोलनात बसस्थानकाचे संपूर्ण कार्यालय समाजकंटकांनी जाळून टाकले. त्यात कार्यालयातील विद्युत यंत्रणा, सीसीटीव्ही यंत्रणा व फर्निचर आगीत भस्मसात झाले. परिणामी, अडीच महिन्यांपासून कार्यालय बंद आहे.
कार्यालय बंद पडल्याने वाहतूक नियंत्रक येत नाही. एक-दोन बस वगळता बाकीच्या सर्व बस स्थानकात येतच नाहीत. इतर बसही स्थानकात न येता महामार्गावरून तशाच पुढे जातात. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.
बसस्थानकात झालेल्या जाळपोळीमुळे विद्युत यंत्रणा बंद पडली असून बसस्थानकात केवळ अंधाराचे साम्राज्य आहे. त्यामुळे प्रवाशांना सायंकाळनंतर बस स्थानकात बसणे भीतिदायक झाले आहे.
विद्युत यंत्रणा सुरू करून बस स्थानकाचे कार्यालय पूर्ववत
सुरू करण्याची मागणी बस स्थानकातील सर्व व्यावसायिक यांच्यासह भाजपाचे कायदा आघाडीचे जिल्हाध्यक्ष किरण झिंजुरके व जिल्हा युवा मोर्चाचे
जिल्हा संपर्कप्रमुख संदेश जाधव यांनी केली आहे.