चाकणला मिळणार भामा आसखेडचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:28 AM2020-12-16T04:28:49+5:302020-12-16T04:28:49+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क चाकण : भामा आसखेड धरणातून बंद पाइपलाइनद्वारे कायमस्वरूपी पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीच्या सुमारे ६० कोटी२१ लाख ...

Chakan will get water from Bhama Askhed | चाकणला मिळणार भामा आसखेडचे पाणी

चाकणला मिळणार भामा आसखेडचे पाणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

चाकण : भामा आसखेड धरणातून बंद पाइपलाइनद्वारे कायमस्वरूपी पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीच्या सुमारे ६० कोटी२१ लाख रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तांत्रिक मंजुरी दिली आहे. याचा प्रस्ताव पुढील मंजुरीसाठी शासनाकडे पाठवण्यात आल्याची माहिती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी नानासाहेब कामठे यांनी दिली.

चाकण शहराला भामाआसखेड धरणातील पाणी एमजीपीकडून काही भागात तर भामा नदीतून जलशुध्दीकरण करून उर्वरित भागासाठी पाणी पुरवठा करण्यात येत आहे. परंतु चाकण औद्योगिक वसाहतीमुळे शहरातील लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. सध्याची व भविष्यात वाढणारी लोकसंख्या विचारात घेतल्यास शहराला स्वतंत्र पाणी पुरवठा योजनेची गरजेची होती. यासाठी स्वर्गीय माजी आमदार सुरेश गोरे यांनी शासन दरबारी दोन वर्षे पाठपुरावा केला होता. संबधित विभागाच्या मंत्र्यांना भेटून पाणी पुरवठा योजनेला मंजुरी मिळवण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते. नगरपरिषदेने या योजनेसाठी दहा टक्के रक्कम असे ६० लाख रुपये भरणा केला असल्याचे मुख्याधिकारी यांनी सांगितले आहे. चाकण शहराची लोकसंख्या जवळपास दोन लाखांच्या आसपास झाली असून तरंगती लोकसंख्या विचारात घेता साधारण एक लक्ष लोकसंख्येला पाणी पुरवठ्याचा विचार करूनच भामा आसखेड धरणावरून ही सुधारित पाणीपुरवठा योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून तांत्रिक मंजुरी मिळाली असल्याचे पत्र उपअभियंता संजय पाठक यांनी दिले आहे. सध्या शासकीय मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. त्याला मंजुरी मिळाल्यावर पुढील काही महिन्यात प्रत्यक्ष या कामाला सुरुवात होणार आहे. यासाठी ६० कोटी २१ लाख रुपये खर्च येणार आहे. सुमारे पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या भामा आसखेड धरणावरून जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. शहरातील विविध भागात पूर्ण क्षमतेने नागरिकांना पाणी पुरवठा करण्यासाठी पाण्याच्या टाक्या भरण्यात येणार आहे. चाकण शहरासाठी धरणात पाणीसाठा राखीव ठेवण्यासाठी राज्य शासनाने यापूर्वी मंजुरी दिली आहे.

* चाकण शहराला सध्या एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत आहे यामध्ये पहिल्या दिवशी आंबेठाण रोड, राणूबाई मळा, देशमुखआळी, दावडमळा, भुजबळआळी व संपूर्ण शिक्रापूर रस्ता या भागासाठी भामाआसखेड धरणातून महाराष्ट्र जिवन प्राधिकरण यांच्याकडून पुरवठा करण्यात येत आहे. दुसऱ्या दिवशी - संपूर्ण चाकण गावठाण, एकतानगर, आगरवाडी, राक्षेवाडी,पठारवाडी, माळआळी, बाजारपेठ व खंडोबामाळ आदी परिसरासाठी भामानदीवरील बंधार्यातील पाणी जॅकवेल मार्फत जलशुध्दीकरण केंद्रातील टाक्यांमधून पाणी नागरिकांना पुरवठा करण्यात येत आहे.

चौकट

सध्या दर दिवसाकरिता संपूर्ण शहरासाठी १०.३ एमएलडी पाणी आवश्यक आहे. परंतू ऐवढे पाणी उपलब्ध होत नसल्याने दिवसाआड पाणी पुरवठा करून, सर्व शहरातील नागरिकांना व्यवस्थित पुरेल असा पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

चौकट

चाकण शहराची लोकसंख्या वाढत असल्याने भविष्यात शहराला स्वतंत्र पाणी योजना व्हावी, तसेच भामाआसखेड धरणातील ठराविक टक्के पाणी आरक्षित करण्यासाठी स्वर्गीय माजी आमदार सुरेश गोरे यांनी विशेष प्रयत्न केल्यानेच हे काम मार्गी लागत आहे. यासाठी तत्कालीन सर्व पक्षीय नगरसेवकांचे सहकार्य मिळाले आहे. येणाऱ्या काळात चाकणकरांना शुध्द,स्वच्छ व मुबलक पाणी मिळणार आहे.

Web Title: Chakan will get water from Bhama Askhed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.