चाकणच्या सर्वसामान्य कुटुंबातील कन्येची मनोरंजन क्षेत्रातील उत्तुंग भरारी.....
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2019 06:00 AM2019-03-08T06:00:00+5:302019-03-08T06:00:04+5:30
एका सर्वसामान्य कुटुंबातील व प्रतिकुल परिस्थितीत शिक्षण पूर्ण करत घेतलेली मनोरंजनाच्या क्षेत्रात चाकणच्या कन्येने घेतलेली भरारी कौतुकास्पद अशीच...
- हनुमंत देवकर -
चाकण : लहानपणीच वडिलांचे निधन झाल्यावर आईने मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी रोजगार करून पेलली. याच्या जाणिवेतूनच तिने आपले वाणिज्य शाखेचे शिक्षण पूर्ण केल्यावर बँक ऑफ महाराष्ट्र, अॅक्सिस बँक, लोकमत वृत्तपत्र करत कुटुंबाला हातभार लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. त्यानंतर लग्नानंतर त्यांनी पाच वर्ष संसाराची जबाबदारी सांभाळली. एके दिवशी त्यांच्यापुढे सुवर्णसंधी चालून आली आणि त्यांच्या आयुष्याची पाऊलवाट सोनेरी झाली.. ही कहाणी आहे..’ चला हवा येऊ द्या सह झी मराठी वरील कलाकारांचे ड्रेपरी करीत असलेल्या रोहिणी मराठे-कोरगावकर....
जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेणाऱ्या महिलांच्या प्रेरणादायी कहाण्या समोर येतात. अशीच एका सर्वसामान्य कुटुंबातील व प्रतिकुल परिस्थितीत शिक्षण पूर्ण करत घेतलेली मनोरंजनाच्या क्षेत्रात चाकणच्या कन्येने घेतलेली भरारी कौतुकास्पद अशीच आहे..का सर्व साधारण आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील रोहिणी योगेश्वर मराठे-कोरगावकर ही युवती प्रतिकूल परिस्थिती शिक्षण घेऊन त्यावर मात करून चला हवा येऊ द्या सह झी मराठी वरील कलाकारांचे ड्रेपरी करीत आहे. याप्रवासाबद्दल रोहिणी म्हणाल्या, लहानपणी वडिलांचे निधन झाल्यावर आईने मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी रोजगार करून पेलली. रोहिणी या प्रवासाबद्दल यांचे वाणिज्य शाखेपर्यंतचे शिक्षण चाकण येथे पुर्ण झाले. शिक्षण घेत असतानाच बँक ऑफ महाराष्ट्र, अॅक्सिस बँक येथे काम केले. यामुळे कमी वयात बऱ्यापैकी ज्ञान प्राप्त केले. त्यानंतर त्यांनी लोकमत वृत्तपत्राच्या चाकण शाखेत काम केले. लोकमत पेपर ने त्याना एक नवीन ओळख करुन दिली. त्यानंतर त्यांचे लग्न झाले. त्या पाच वर्षांपर्यंत सगळ्यापासुन लांब झाल्या. त्यानंतर त्यांना एस्सेल व्हिजनचे ऑडिटर सचिन चौगुले यांनी चला हवा येऊ द्या मध्ये साडी ड्रेपिंगचे काम कराल का असे विचारले. पुन्हा काहीतरी करण्याची सुवर्ण संधी होती. तसा कामाचा अनुभव काही नव्हता, सर्व प्रोफेशनल लोक, पण जास्त काही विचार न करता त्यांनी होकार दिला.
सर्व कलाकारांसोबत काम करतानाचा खुप छान अनुभव मिळाला. प्रत्येक काम प्रचंड आत्मीयतेने त्या शिकत गेल्या. भाऊ कदम, सागर कारंडे, कुशल बद्रिके, अंकुश, योगेश, श्रेया बुगडे या कलाकारांसोबत साडी ड्रेपरी चे काम सुरु केले. हे काम करता करता चला हवा येऊ द्या मधील वेशभूषा डिझायनर पोर्णिमा ओक यांनी त्यांची असिस्टंट म्हणून नेमणूक केली. सध्या रोहिणी झी मराठी, कलर मराठी चा एकदम कडक या रिअॅलिटी शो मधे डिझायनर असिस्टंट म्हणून काम करतात. तसेच झी मराठी, झी टॉकीज, झी युवा यांचे होणारे इव्हेन्टचे ही डिझायनर असिस्टंट म्हणून रोहिणी काम पाहते. तसेच मुंबईत झालेल्या पोलिस इव्हेंट ही त्यांनी असिस्ट केला आहे. रोज पुणे-मुंबई-पुणे असा खडतर प्रवास त्यांचा चालू आहे. तरीही पण त्या त्यांचे काम खुप एन्जॉय करतात.