चाकणच्या खराबवाडीतील कचरा पेटणार
By admin | Published: October 5, 2015 01:54 AM2015-10-05T01:54:44+5:302015-10-05T01:54:44+5:30
खराबवाडीच्या वाघजाईनगरजवळील दगड-खाणीतील कचरा डेपो त्वरित न हलवल्यास आमरण उपोषण करून तीव्र आंदोलनाचा इशारा वाघजाईनगर
चाकण : खराबवाडीच्या वाघजाईनगरजवळील दगड-खाणीतील कचरा डेपो त्वरित न हलवल्यास आमरण उपोषण करून तीव्र आंदोलनाचा इशारा वाघजाईनगर, बिरदवडीच्या ग्रामस्थांनी व पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाच्या खराबवाडी येथील औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांनी दिला आहे.
ग्रामस्थ दररोज कचऱ्याच्या गाड्या अडवीत असूनही रात्री-अपरात्री तसेच दिवसाढवळ्या कचऱ्याच्या गाड्या बिनधास्तपणे खाली केल्या जात आहेत. हा कचरा डेपो त्वरित हलविला नाही तर खेड तहसील कार्यालयापुढे पुन्हा एकदा गावातील सर्व कुटुंबांतील आबालवृद्ध व महिलांसह उपोषण करण्याचा इशारा वाघजाईनगर ग्रामस्थांनी दिला आहे. तसेच कचऱ्याच्या गाड्या पेटवून देण्याचा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब शिळवणे व वाघजाईनगर ग्रामस्थांनी दिला आहे.
हा कचरा दररोज पेटवून देत असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर वायुप्रदूषणही होत आहे. या कचऱ्याची त्वरित विल्हेवाट लावून दगड-खाणीतील कचरा डेपो बंद करण्याची मागणी माजी उपसरपंच बाळासाहेब शिळवणे, ग्रा. पं. सदस्य रोहिदास शिळवणे, माजी सदस्य राहुल शेलार, रामदास शिळवणे, दत्तात्रय शिळवणे, तुकाराम शिळवणे, सचिन शिळवणे, दत्ता शिळवणे, सोपान शिळवणे, संतोष शिळवणे, भगवान गायकवाड, लक्ष्मण शेडगे व ग्रामस्थांनी केली आहे.
यापूवीर्ही खराबवाडी ग्रामस्थ व हनुमान प्रासादिक भजनी मंडळाने दोन वर्षांपूर्वी तहसील कार्यालयासमोर उपोषण केले होते. त्या वेळी प्रांताधिकाऱ्यांनी हा कचरा डेपो हलविण्याचे आश्वासन दिले होते. हा डेपो चाकणची राक्षेवाडी येथील गायरान जागेत हलविण्यासाठी पाहणी करण्यात आली असून, त्याची त्वरित अंमलबजावणी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. (वार्ताहर)