चक्का जाम आंदोलन आज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2017 11:49 PM2017-08-13T23:49:51+5:302017-08-13T23:49:56+5:30
राज्य सरकारने शेतक-यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्य सरकारने शेतक-यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, या मागण्यांसाठी येत्या १४ आॅगस्ट रोजी शेतकरी संघटनांच्या वतीने जिल्ह्यात ‘चक्का जाम’ आंदोलन करण्यात येणार आहे. जिल्ह्यात बारामती, इंदापूरसह शिरुर, चाकण, दौंड आणि जुन्नर परिसरात आंदोलन केले जाणार आहे.
राज्य शासनाने शेकतरी कर्जमाफीची घोषणा केली असली तरी ती फसवी असून शासनाने घातलेल्या अटींमुळे कर्जबाजारी शेतक-यांना दिलासा मिळणार नाही. त्यामुळे सर्व शेतकरी संघटनांनी
एकत्र येऊन सुकाणू समितीच्या माध्यमातून चक्का जाम आंदोलन केले जाणार आहे.
राज्य सरकारने सुमारे ३४ हजार कोटी रुपयांची कर्जमाफीची घोषणा केली असली, तरी या फसव्या कर्जमाफीच्या जनजागृतीसाठी चक्का जाम आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी संघटना यांच्यासह विविध संघटना सहभागी होणार आहेत.
स्वाभिमानी शेतकरी
संघटनेचे योगेश पांडे म्हणाले, संघटनेच्या वतीने शहरामध्ये आंदोलन केले जाणार नाही. जिल्ह्यात बारामती, शिरुर आणि चाकण येथे आंदोलन केले जाईल. संघटनेचे प्रमुख खासदार राजू शेट्टी हे खामगाव येथे आंदोलनात सहभागी होतील.
शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील म्हणाले, जुन्नर, इंदापूर आणि दौंड येथे संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून जिल्ह्यात चक्का जाम आंदोलन करण्यात येईल.