पुणे-नाशिक महामार्गावर चक्का जाम
By admin | Published: August 30, 2015 02:59 AM2015-08-30T02:59:19+5:302015-08-30T02:59:19+5:30
कुंभमेळा, रक्षाबंधन आणि शनिवार-रविवारची जोडून आलेली सुटी असा तिहेरी ताण वाहतुकीवर आल्याने पुणे-नाशिक महामार्गावर आज चक्का जाम झाले. या मार्गावर दिवसभर
राजगुरुनगर : कुंभमेळा, रक्षाबंधन आणि शनिवार-रविवारची जोडून आलेली सुटी असा तिहेरी ताण वाहतुकीवर आल्याने पुणे-नाशिक महामार्गावर आज चक्का जाम झाले. या मार्गावर दिवसभर वाहतूककोंडी होती. एक-एक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या
होत्या. पुण्याहून राजगुरुनगरला पोहोचण्यासाठी लोकांना चार तासांचा कालावधी लागत होता.
कुंभमेळ्यात आज शाही स्नान असल्यामुळे पुण्याकडून नाशिकला जाणऱ्या वाहनांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली होती. सकाळी ११ वाजल्यापासूनच वाहतूककोंडीला सुरुवात झाली. पोलिसांनी वाहतुकीचे नियमन करूनही वाहतूककोंडी होतच होती. मुळातच अरुंद असलेल्या भीमा नदी आणि गावातील ओढा या ठिकाणांच्या दोन पुलांमुळे आणि त्याचवेळी राजगुरुनगरकडे वळणाऱ्या रस्त्यांमुळे वाहतूककोंडी होत होती. टोलनाका ते डाकबंगला हे दोन किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी तासभर वेळ जात होता. त्यामुळे प्रवासी आणि वाहनचालक अक्षरश: वैतागले होते. एसटी, बस आणि खासगी वाहनाने येणारे लोक राजगुरुनगरकर चांडोलीला उतरून पायी गावात येत होते. चाकणला राजगुरुनगरपेक्षाही गंभीर परिस्थिती असल्याने काल आणि आज पुण्याहून राजगुरुनगरला पोहोचायला लोकांना चार-चार तास लागले. सुदैवाने घाटात काही गंभीर समस्या उद्भवली नसल्याने हळूहळू का होईना वाहतूक सरकत राहिली. अन्यथा सगळा रस्ताच बंद होण्याची वेळ आली असती. रात्री या महामार्गावर अवजड कंटेनर जात असतात. त्यामुळे वाहतूक
पोलिसांना दिवस-रात्र कामावर हजर राहावे लागले. सलग कामामुळे तेही वैतागले होते.
खड्ड्यांनी घेतला
एकाचा बळी
नाशिक महामार्गावरील खड्ड्यांनी एकाचा जीव घेतला आहे. शुक्रवारी रात्री पुणे - नाशिक महामार्गावर कळंब (ता. आंबेगाव) गावच्या हद्दीत मोटारसायकल खड्ड्यात आदळून तीन जण रस्त्यावर फेकले गेले. त्यातील प्रशांत लक्ष्मण गाढवे (वय ३७, रा. सावरगाव) यांचा मृत्यू झाला, तर संजय श्रीधर वारुळे, विलास रामचंद्र पवार हे दोघे जखमी झाले आहेत.
भीमाशंकर कारखान्याचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम, गोकुळ भालेराव यांनी जखमींना उपचारासाठी हलविले. दरम्यान, महामार्गावरील या खड्ड्याने या तरुणाचा जीव घेतल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन रस्त्यावरील हा धोकादायक खड्डा बुजवून टाकला. अपघातातील एक जण हेल्मेटमुळे वाचला. मात्र, हेल्मेटचा चक्काचूर झाला. जयसिंंग रमाजी गाढवे, (रा. सावरगाव, घाडगेवाडी) यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी मोटारसायकलचालक विलास रामचंद्र पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक जे. पी. डमाळे करीत आहेत.