चाळी होताहेत नामशेष
By admin | Published: June 1, 2017 02:10 AM2017-06-01T02:10:35+5:302017-06-01T02:10:35+5:30
पिंपरी- चिंचवड शहर हे औद्योगिक नगरी म्हणून ओळखली जाते. राज्यभरातून नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून रोजगाराच्या
लोकमत न्यूज नेटवर्क
रहाटणी : पिंपरी- चिंचवड शहर हे औद्योगिक नगरी म्हणून ओळखली जाते. राज्यभरातून नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून रोजगाराच्या उद्देशाने अनेक नागरिक येथे येऊन राहण्यासाठी आसरा शोधू लागतात. बरेच नागरिक कामाच्या ठिकाणीच राहतात. मात्र, सर्वांनाच हे जमते असे नाही. त्यासाठी भाड्याने एखादी रूम घेणे पसंत करतात. त्यासाठी या उपनगरातील अनेक स्थानिकांनी चाळी बांधून रूम भाड्याने देण्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू केला. मात्र, या चाळीच्या जागी बहुमजली इमारती उभ्या केल्या जात आहेत. त्यामुळे या उपनगरातील अनेक दशकांची चाळ संस्कृती बंद झाल्याने कमी भाड्याचे घर नागरिकांना मिळणे मुश्कील झाले आहे. या शहरात सर्वसामान्य नागरिकांना घर घेणे परवडत नाही तर भाड्याने घर मिळत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
पालिकेने अनधिकृत बांधकामांवर निर्बंध आणल्याने अनेक घरमालक चाळी बिल्डरला विकत आहेत किंवा भागीदारीत बहुमजली इमारती बांधण्यावर भर देत आहेत़ कामाच्या शोधात अनेक कामगार राहण्यास घर शोधात आहेत, सध्या शहरात कामाचा सुकाळ असला तरी राहण्यास घर मिळत नसल्याने अनेक कामगार गावी परतू लागले आहेत. वन बीएच के किंवा वन आरके मध्यमवर्गीय नागरिकांना न परवडणारे असल्याने आहे त्या सिंगल खोल्याना मोठ्या प्रमाणात भाव आले आहेत. सध्या ज्यांच्याकडे सिंगल रूम आहे त्याचे भाडे चार ते साडेचार हजाराच्या पुढेच असून लाईट बिल वेगळे आकारले जात आहे. त्यामुळे सिंगल रूमला महिना ५ हजार मोजावे लागत असल्याने अनेक नागरिक मेटाकुटीला आले आहेत. महिन्याचा आर्थिक खर्च व कमाई याचा ताळमेळ लागत नसल्याने कामगार वर्गात दैनंदिन जीवन कसे जगावे हा खूप मोठा प्रश्न उपस्थित झाला असल्याने अनेकांनी ह्यगड्या आपला गावच बराह्ण हा पर्याय निवडला आहे. विशेष म्हणजे अशा ठिकाणी काम करणारा मध्यम वर्ग हा बहुधा चाळीत राहत होता त्यांनी भाडे परवडत नाही म्हणून शहरातून आपल्या गावी व कामाच्या शोधात इतरत्र स्थलांतर करत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
चाळीत राहातो तो सर्वसामान्य कामगार माणूस, छोटे व्यावसायिक मात्र चाळीच नाहीशा होत असल्याने अनेकांची परवड होत आहे. तर दुसरीकडे आहे त्या चाळी
मालकांनी भाडे वाढविण्याचा
झपाटा लावला आहे. सध्या शाळांना सुटी असल्याने अनेक कुटुंब
गावी गेले आहेत. जे नागरिक सध्या शहरात वास्तव्यास आहेत ते नागरिक आताच गल्लोगल्ली भाड्याने रूम आहे का रूम म्हणत फिरताना दिसून येत आहेत.
विकसकाशी करार : उत्पन्नासाठी टोलेजंग इमारती
शहरात वाढती लोकसंख्या पाहून अनेक स्थानिक जागा मालकांनी लाखो रुपये खर्च करून उत्पन्नाचे साधन म्हणून ठिकठिकाणी चाळी उभारल्या आहेत़ त्यातून येणारे उत्पन्न हेच त्याचे उदरनिर्वाहाचे साधन बनले होते. मुलांचे शिक्षण, घर खर्च, दवाखाना, लग्न कार्य व इत्तर दैनंदिन खर्च याच उत्पन्नावर अवलंबून होते. मात्र, चाळीतील भाड्यापेक्षा इमारतीतील भाडे जास्त येत असल्याने अनेकांनी चाळी पाडून इमारत बांधण्याचा सपाटा लावला आहे. एखाद्या नागरिकाला भाड्याने रूम देताना भाडे करार करून त्याची पोलीस स्टेशनला नोंद करणे बंधनकारक करण्यात आल्याने घर मालक मेटाकुटीला आले होते. नको ती भानगड म्हणत अनेकांनी चाळी पाडण्याचा सपाटा लावला आहे.