पंतप्रधान आवास योजनेचे चलन लवकर घ्यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 09:37 AM2020-11-22T09:37:13+5:302020-11-22T09:37:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : महापालिकेकडून प्रधानमंत्री आवास योजनेची २ हजार ९१८ घरांची सोडत नुकतीच पार पडली. या सोडतीमधील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : महापालिकेकडून प्रधानमंत्री आवास योजनेची २ हजार ९१८ घरांची सोडत नुकतीच पार पडली. या सोडतीमधील लाभार्थ्यांनी चलन घेणे आवश्यक असून अद्याप चौदाशे नागरिकांनी चलन घेतलेले नाही. लाभार्थ्यांची दहा टक्के रक्कम भरण्याची मुदत २३ नोव्हेंबर रोजी संपते आहे. त्यामुळे नागरिकांनी लवकरात लवकर चलन घेऊन जावे असे आवाहन पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी केले आहे.
पालिकेने खराडी, हडपसर, वडगाव शेरी येथील पाच प्रकल्पाअंतर्गत घरकुलांचे ऑनलाईन सोडत पद्धतीने वाटप करण्यात आले. सोडतीमध्ये घर मिळालेल्या लाभार्थ्यांनी दहा टक्के रक्कम ३० दिवसात भरणे आवश्यक आहे. यासाठी दहा टक्के रक्कम भरण्यासाठी चलन घेणे आवश्यक आहे. आतापर्यंत दीड हजार लाभार्थ्यांनी चलन घेतले आहे. त्यापैकी २४० लाभार्थ्यांनी दहा टक्के रकमेचा भरणा केला आहे. अद्याप १४१८ नागरीकांनी हे चलन नेलेले नाही. या नागरिकांच्या सोईसाठी २१ व २२ नोव्हेंबर रोजी सावरकर भवन येथील कक्ष सुरू ठेवण्यात येणार आहे. ज्यांनी चलन नेले नाहीत अशा नागरिकांनी चलन घेऊन जाऊन २३ नोव्हेंबरपर्यंत दहा टक्के रकमेचा ऑनलाईन भरणा करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
---------
जे लाभार्थी दहा टक्के रक्कम भरतील त्यांना तात्पुरते वाटप पत्र दिले जाणार आहे. लाभार्थ्यांनी २३ तारखेपर्यंत दहा टक्के रक्कम न भरल्यास त्यांचा लाभ रद्द करून प्रतीक्षा यादीतील अर्जदारांना देण्यात येणार आहे. बँक लोन तसेच प्रकल्पाच्या माहितीसाठी सावरकर भवन येथे स्वतंत्र कक्ष उभारण्यात आलेला आहे.