शिंदे गटाच्या खासदारांसमोर भाजपच्या आमदारांचे आव्हान; मावळ, शिरूर दोन्हीकडे भाजपचे इच्छुक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2023 04:11 PM2023-06-08T16:11:13+5:302023-06-08T16:11:59+5:30

सध्या मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघ भाजप शिवसेना युतीमध्ये शिवसेनेकडे (शिंदे गटाकडे) आहे

Challenge of BJP MLAs to Shinde Group MPs BJP aspirants in both Maval and Shirur | शिंदे गटाच्या खासदारांसमोर भाजपच्या आमदारांचे आव्हान; मावळ, शिरूर दोन्हीकडे भाजपचे इच्छुक

शिंदे गटाच्या खासदारांसमोर भाजपच्या आमदारांचे आव्हान; मावळ, शिरूर दोन्हीकडे भाजपचे इच्छुक

googlenewsNext

पिंपरी : लोकसभा निवडणुकीसाठी दहा महिन्यांचा कालावधी बाकी असताना सर्वच पक्षातील नेत्यांनी निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघ भाजप शिवसेना युतीमध्ये शिवसेनेकडे (शिंदे गट) आहे. मात्र, भाजपच्या महेश लांडगे यांनी शिरुर तर माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी मावळ लोकसभा मतदारसंघासाठी शड्डू ठोकला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीसाठी शिंदे गटाच्या आजी-माजी खासदारांसमोर भाजपच्या आजी-माजी आमदारांचे मोठे आव्हान असणार आहे.

मावळ लोकसभेमध्ये शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मावळमधून अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांची शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांच्यासोबत लढत होती. बारणे यांनी पवार यांचा पराभव केला. तर, शिरूरमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव केला. सद्यस्थितीत हे दोन्ही आजी-माजी खासदार शिंदे गटामध्ये असून, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. युतीमध्ये शिंदे गटालाच जागा मिळणार असल्याचा दावा हे दोन्हीही नेते करत आहेत. तर दुसरीकडे भाजपने देखील तयारी सुरू केली आहे. दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीसाठी समन्वय नेमले आहेत. तर पक्षाने संधी दिल्यास लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी बुधवारी जाहीर केले. तर आपण २०१९ पासूनच शिरुर लोकसभा लढवण्याच्या तयारीत असल्याचे भाजपचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी सांगितले.

शिंदे गटाचे आजी-माजी खासदार निवडणुकीसाठी तयारी करत असताना त्या मतदारसंघामध्ये समनव्यक नेमत भाजपाने शिंदे गटाला यापूर्वीच मोठा धक्का दिला आहे. तर आता दोन्ही मतदार संघातील आजी-माजी आमदार मैदानात उतरणार असल्याने शिंदे गटापुढील अडचणी वाढणार आहेत. तर अपेक्षित जागी उमेदवारी न मिळाल्यास दोन्ही पक्षांतील इच्छुक उमेदवार व कार्यकर्ते यांच्यापुढे युती धर्म टिकविण्याचे मोठे आव्हान असणार आहे.

''आम्ही युतीसाठी काम करत आहोत. पक्षाने संधी दिल्यास पक्षाचा आदेश पाळणार आहे. पक्ष जे काम सांगेल ते काम प्रामाणिकपणे करत आहे. - बाळा भेगडे, माजी राज्यमंत्री.''

''मी २०१९ पासूनच शिरूर लोकसभेसाठी तयारी करत आहे. पक्षाने संधी दिली तर संपूर्ण ताकदीने शिरूर लोकसभा लढवणार आहे. - महेश लांडगे, शहराध्यक्ष तथा आमदार.'' 

Web Title: Challenge of BJP MLAs to Shinde Group MPs BJP aspirants in both Maval and Shirur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.