रस्त्यावरची गुंडगिरी रोखण्याचे पोलिसांपुढे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:07 AM2021-01-01T04:07:09+5:302021-01-01T04:07:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : प्रसंग मध्यरात्रीचा एका चौकातील. एक कार सिग्नलला थांबते. दुचाकीवरुन काही टपोरी तरुण कारजवळ येऊन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : प्रसंग मध्यरात्रीचा एका चौकातील. एक कार सिग्नलला थांबते. दुचाकीवरुन काही टपोरी तरुण कारजवळ येऊन काहीतरी कारण सांगून त्याला खाली उतरायला सांगून धमकाविण्यास सुरुवात करतात. पण चालक वेळीच पुढचा धोका ओळखून सिग्नल तोडून कार पुढे दामटतात. हे तरुण त्यांचा पाठलाग सुरु करतात. ते पाहून कारचालक एका पोलीस चौकीत शिरतात. मध्यरात्रीच्या वेळी पोलीस चौकीत कोणी नव्हते. हे तरुण तो कधी बाहेर येईल याची वाट पहात बाहेर घिरट्या घालू लागतात. पण तासाभरानंतरही पोलीस चौकीत कोणीही फिरकत नाही. या तरुणांना चौकीत कोणी नाही, हे न समजल्याने शेवटी ते निघून जातात.
असे प्रसंग शहरात ठिकठिकाणी घडताना दिसत आहेत. अनेकांना काही तरी कारण सांगून मारहाण करुन लुटले जात आहे. शिवाजी रोडवर निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला मारहाण करुन लुटले होते. स्वारगेट बसस्थानकावर प्रतिकार केल्याने एकाचा खून करण्यात आला. रात्री-अपरात्री बाहेरगावाहून येणाऱ्यांना लुटण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. शहरात गेल्या वर्षीच्या तुलनेत दुखापतीच्या गुन्ह्यात मोठी वाढ झाली आहे. याशिवाय असंख्य गुन्हे तर पोलिसांपर्यंत पोहचत नाही. रस्त्यावर रात्री अपरात्री घडणारी ही गुन्हेगारी रोखणे व नागरिकांना दिलासा देणे हे शहर पोलिसांसमोरील नव्या वर्षातील मोठे आव्हान असणार आहे.
लॉकडाऊनमुळे जवळपास चार महिने गुन्ह्यांची संख्या कमी झाली होती. त्यामुळे २०२० मधील गुन्ह्यांची तुलना २०१९ शी केल्यास शहरातील गुन्हेगारी कमी झाली असा समज होऊ शकतो. सुदैवाने पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर स्पष्टपणे सांगितले होते की, अनेकदा आकडेवारी ही फसवी असते. त्यावर आपण जास्त अवलंबून रहात नाही.
ऑनलाईन व्यवहार वाढल्याने शहरातील सायबर गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पटीहून अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. सायबर गुन्ह्यांचा तपास हा काहीचा जिकरीचा आणि वेळखाऊ असतो. शिवाय हे गुन्हेगार जगाच्या पाठीवर कोठेही बसून गुन्हे करत असतात. त्यामुळे त्यांचा शोध घेण्याचे काम अधिक वेगाने करुन गुन्हे उघडकीस आणणे हे मोठे आव्हान पोलिसांसमोर असणार आहे.
चौकट
नव्या वर्षात शहरात मेट्रो सुरु होण्याची शक्यता आहे. मेट्रोमुळे शहरातील रस्ते वाहतूकीची कोंडी काही प्रमाणात तरी कमी होण्याची अपेक्षा आहे. त्याचा आत्ताच विचार करुन त्यानुसार पुढील २० ते २५ वर्षाचे नियोजन वाहतूक पोलिसांना, महापालिका, पीएमआरडीए यांच्यासमवेत करावे लागणार आहे. नाही तर संपूर्ण पुण्यातली वाहतूक कोंडी दिवसेंदिवस जीवघेणी होण्याचा धोका आहे.