‘पीएमपी’समोर निम्म्या प्रवाशांवर धावण्याचे आव्हान; कोरोना असेपर्यंत एकाआड एक आसन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2020 09:05 PM2020-05-30T21:05:58+5:302020-05-30T21:09:03+5:30
लॉकडाऊनमुळे पीएमपीला सध्या दर महिन्याला सुमारे ५० ते ६० कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे.
पुणे : पिंपरी चिंचवडमध्ये काही मार्गांवर बससेवा सुरू झाल्यानंतर आता पुण्यातही बस मार्गावर येणार का?, याबाबत प्रशासकीय पातळीवर अद्याप तळ्यात मळ्यात आहे. मात्र, बससेवा सुरू झाली तरी निम्म्या प्रवाशांवर धावावे लागणार आहे. बसमध्ये एकाआड एक आसनांवर प्रवाशांना बसावे लागणार असून उभे राहून प्रवास करता येणार नाही. 'पीएमपी'ला कोरोनाचा प्रादुर्भाव असेपर्यंत किमान पाच ते सहा महिने निम्म्या प्रवाशांवर धावण्याचे आव्हान पेलावे लागणार असल्याचे संकेत पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी दिले.
कोरोना विषाणुचा संसर्ग रोखण्यासाठी तोंडाला मास्क आणि सुरक्षित शारीरिक अंतर हे दोन महत्वाचे सामाजिक नियम पाळणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने पीएमपी बसमध्ये प्रवास करतानाही दक्षता घ्यावी लागणार आहे. रेड झोनमधून बाहेर पडलेल्या पिंपरी चिंचवडमध्ये ही दक्षता घेऊन बससेवा सुरू करण्यात आली आहे. पुण्यामध्ये बससेवा सुरू करण्याबाबत अजून निर्णय झालेला नाही. पण ही सेवा सुरू झाल्यानंतर पीएमपी प्रशासनाला विशेष दक्षता घ्यावी लागणार आहे. त्यादृष्टीने विविध उपाययोजना कराव्या लागणार असून त्याची तयारी केली जात आहे. यांसह विविध मुद्यांवर नयना गुंडे यांनी ह्यलोकमतह्णला माहिती दिली. ह्यप्रवाशांमध्ये सुरक्षित अंतर राखण्यासाठी क्षमतेपेक्षा निम्मेच प्रवासी घ्यावे लागणार आहेत. १२ मीटर लांबीच्या बसमध्ये २१ आणि मिडी बसमध्ये १७ प्रवासी असतील. उभे राहून प्रवास करता येणार नाही. त्यानुसार बसमधील आसनांवर मार्किंग केले जात आहे. तसेच प्रत्येक प्रवाशाला मास्क बंधनकारक असेल. कोरोनाचा प्रादुर्भावर लवकर कमी होण्याची शक्यता नाही. त्यामुळे पुढील किमान सहा महिने किंवा त्याहून अधिक काळ ही बंधने पाळावी लागणार आहेत, असे गुंडे यांनी सांगितले.
-------------
कशी सुरू आहे तयारी?
- प्रत्येक बसमधील आसनांवर एकाआड एक मार्किंग केले जात आहे. जिथे मार्किंग असेल तिथे प्रवाशांना बसता येणार नाही.
- बसमध्ये मास्क बंधनकारक
- चालकाच्या केबीनला सुरक्षा कवच
- प्रत्येक बसमध्ये सॅनिटायझर ठेवण्याचा प्रयत्न
- आगारामध्ये मास्क, सॅनिटायझेशन
- बसमध्ये कोरोनाविषयक माहिती आणि सुचना
- प्रत्येक फेरीला बस स्वच्छ करण्यासाठी स्वतंत्र टीम
------------------
कोणालाही कुठेही काम
कोरोना विषाणुचा संसर्ग वाढल्याने बससेवा जवळपास ठप्प आहे. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना काम देता येत नाही. यापार्श्वभुमीवर नयना गुंडे यांनी कोणत्याही कर्मचाऱ्यांला क्षमता व गरजेनुसार कोणत्याही विभागात काम करावे लागेल, असा आदेश काढला आहे. त्यानुसार वाहकांना स्वच्छता विभाग, बीआरटी मार्ग तसेच इतर कर्मचाऱ्यांवर इतर कामेही सोपविली जात आहेत.
------------
आर्थिक भार कसा पेलणार?
लॉकडाऊनमुळे पीएमपीला सध्या दर महिन्याला सुमारे ५० ते ६० कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. पुण्यामध्ये बससेवा सुरू झाल्यानंतरही त्यात फारशी सुधारणा होणार नाही. त्यासाठी प्रशासनाने दोन्ही महापालिकांकडे थकित रक्कम देणे तसेच संचलन तुटीबाबत प्रस्ताव दिला आहे. पुर्वीप्रमाणेच यापुढेही होणारी तुटीचा भारही दोन्ही महापालिकांना उचलावा लागणार आहे.
-----------
पुण्यात कशी असेल सेवा?
पुण्यामध्ये बससेवा सुरू झाली तरी सुरूवातीला काही महत्वाच्या मार्गांवरच सुरू केली जाईल. तसेच आयटी, औद्योगिक क्षेत्र, बाजारपेठा, इतर महत्वाच्या आस्थापनांसाठीही सेवा असेल. त्याला मिळणारा प्रतिसाद विचारात घेऊन अन्य मार्गांवर सेवा सुरू करणे किंवा बस वाढविण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.
-------------
रोजंदारी कर्मचाऱ्यांचे काय?
मार्च महिन्यामध्ये काही दिवस काम न करताही त्यांना संपुर्ण वेतन दिले. एप्रिल महिन्यातही ४१९ जणांना वेतन दिले. ज्यांना काम दिले जाईल, त्यांना वेतनही मिळेल. पण आता काम नाही. बससेवा सुरू झाल्यानंतर त्यांनाही काम मिळत जाईल, असे नयना गुंडे यांनी स्पष्ट केले.
---------------