फोटो व्होटर स्लिपा वाटण्याचे आव्हान
By admin | Published: October 9, 2014 05:13 AM2014-10-09T05:13:46+5:302014-10-09T05:13:46+5:30
जिल्ह्यातील केवळ वीस टक्के मतदारांपर्यंतच फोटो व्होटर स्लिपा पोहोचविण्यात प्रशासनाला यश आले आहे.
पुणे : जिल्ह्यातील केवळ वीस टक्के मतदारांपर्यंतच फोटो व्होटर स्लिपा पोहोचविण्यात प्रशासनाला यश आले आहे. येत्या पाच दिवसांत दररोज दहा लाख स्लिपा वाटण्याचे आव्हान प्रशासनाला पेलावे लागणार आहे.
निवडणूक आयोगाने सर्व मतदारांना व्होटर स्लीप वाटण्याचा आदेश दिला आहे. जिल्ह्यात ६९ लाख २९ हजार ७६८ लोकसंख्या आहे. यातील केवळ वीस टक्के मतदारांपर्यंत छायाचित्र असलेली व्होटर स्लीप पोहोचली आहे. अजूनही ५५ लाख मतदारांना व्होटर स्लीप मिळालेली नाही. शहरात पिंपरी-चिंचवड, भोसरी, तर इंदापूर, बारामती मतदारसंघातील स्लीप वाटपाचे प्रमाण अत्यंत कमी आहे.
बूथ लेव्हल आॅफिसरच्या माध्यमातून या स्लीप वाटण्याचे काम सुरूआहे. येत्या १५ आॅक्टोबरला मतदान असल्याने १३ आॅक्टोबरपर्यंत व्होटर स्लीप वाटण्याचे आव्हान आहे. म्हणजेच प्रशासनाकडे पाच दिवस असून, दररोज दहा लाखांपेक्षा अधिक स्लिपा देण्याचे काम प्रशासनाला करावे लागणार आहे. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात स्लिपा वाटण्याचे काम अधिक खडतर आहे. पत्ता न सापडणे, स्थलांतरित मतदार यामुळे स्लिपा वाटणे जिकिरीचे ठरत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.