विद्यापीठाच्या कंपनीसमोर परीक्षा घेण्याचे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:12 AM2021-03-10T04:12:40+5:302021-03-10T04:12:40+5:30
विद्यापीठाची परीक्षेसाठी आतापर्यंत ५ लाख ८४ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. प्रथम वर्ष कला अभ्यासक्रमाचे विद्यार्थी वगळता इतर सर्व ...
विद्यापीठाची परीक्षेसाठी आतापर्यंत ५ लाख ८४ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. प्रथम वर्ष कला अभ्यासक्रमाचे विद्यार्थी वगळता इतर सर्व अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्यास १० मार्चपर्यंत मुदत दिली आहे. त्यामुळे सुमारे ६ लाख २० हजार विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यावी लागणार आहे. विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या परीक्षेसाठी नियुक्त केलेल्या एजन्सीला ऑनलाइन परीक्षांचे आयोजन करताना अडचणी आल्या. त्याचा फटका हजारो विद्यार्थ्यांना बसला. परंतु, काही विद्यार्थ्यांनी घरी बसून पुस्तकात पाहून व इंटरनेटवर उत्तरे शोधून परीक्षा दिल्याचे दिसून आले. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना चुकीची प्रश्नपत्रिका पाठवणे, उशिरा प्रश्नपत्रिका मिळणे, प्रश्नपत्रिकेत चुकीचा फाँट दिसणे, आकृत्या व नकाशे न दिसणे अशा अनेक अडचणी परीक्षेदरम्यान आल्या. त्यामुळे परीक्षेत झालेल्या या सर्व गोंधळामुळे विद्यापीठाची नाचक्की झाली.
आता विद्यापीठावर ऐनवेळी परीक्षेसाठी एजन्सी बदलण्याची वेळ आली. परीक्षा घेण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवली असती तर परीक्षा आणखी एक ते दीड महिना लांबली असली. त्यामुळे विद्यापीठाने आपल्या स्वत:च्या कंपनीकडून परीक्षा घेण्याचे निश्चित केले. या पूर्वी झालेल्या परीक्षेसाठी एसपीपीयू कंपनीतील काही कर्मचा-यांनी विद्यापीठाला सहकार्य केल्याने परीक्षेचे नियोजन करताना कोणत्या अडचणी येऊ शकतात, याबाबत कंपनीच्या पदाधिकाऱ्यांना कल्पना आहे. मात्र, या कंपनीला परीक्षेच्या आयोजनासाठी आवश्यक असेलेले सर्व्हर आणि इतर सॉफ्टवेअरसाठी दुस-या कंपनीचे सहकार्य घ्यावे लागणार आहे.
--
दुसऱ्या सत्राची परीक्षा लांबणार
प्रथम सत्राची परीक्षा येत्या ११ एप्रिलपासून सुरू होणार असून मे महिना अखेरपर्यंत चालणार आहे. त्यामुळे दुसऱ्या सत्राची परीक्षा काही दिवस पुढे जाणार आहे. परिणामी जून किंवा जुलै महिन्यापर्यंत दुसऱ्या सत्राची परीक्षा घ्यावी लागणार आहे. त्यामुळे विद्यापीठाने आत्तापासूनच दुसऱ्या सत्राच्या परीक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या बाबींची पूर्तता करावी, असे मत तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे. कोरोनामुळे पहिल्या व दुसऱ्या सत्राच्या परीक्षा एकत्रितपणे घेतल्या जाणार आहेत.