शक्तिप्रदर्शनातून दिले परस्परांना आव्हान

By admin | Published: February 20, 2017 02:36 AM2017-02-20T02:36:24+5:302017-02-20T02:36:24+5:30

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस नेमका रविवारचा आल्याने तो पुरेपूर साजरा करीत

Challenges given by power demonstrations | शक्तिप्रदर्शनातून दिले परस्परांना आव्हान

शक्तिप्रदर्शनातून दिले परस्परांना आव्हान

Next

पुणे : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस नेमका रविवारचा आल्याने तो पुरेपूर साजरा करीत जिल्ह्यातील सर्व पक्षांनी जोरदार प्रचाराचा धडाका उडवून दिला. सर्व महत्त्वाच्या पक्षांनी प्रचार रॅली काढून जोरदार शक्तिप्रदर्शन केल्यानंतर त्या त्या भागातील प्रमुख नेत्यांच्या सभा होऊन प्रचाराची सांगता झाली.
पक्षांचे झेंडे, उपरणी, फेटे घालून आपल्या उमेदवाराच्या प्रचाराचे फलक धरून सकाळपासूनच तालुक्यांमध्ये ठिकठिकाणच्या गट-गणांमध्ये जोरदार प्रचार रॅली काढण्यात आल्या. स्पीकर्सवरून संबंधित उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहन केले जात होते. प्रचार रॅलीमध्ये महिलांचा सहभाग अधिकाधीक राहील असा प्रयत्न केल्याचे दिसून येत होते. एखादी मिरवणूक निघावी अशा थाटात उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन केले.
प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या रॅली एकमेकांसमोर आल्यानंतर आणखी जोर चढून प्रचार कुणाचा भारी याची चढाओढ लागलेली दिसून येत होती.

शिवजयंतीचे साधले औचित्य

शिरूर तालुक्यामध्ये प्रचारामध्ये व्यक्तिगत भेटी गाठी व कोपरासभांवर भर दिला गेला. कोणत्याही बड्या नेत्याची
सभा झाली नाही. शिवजयंती असल्याने त्याचे औचित्य साधून मतदारांना भेटण्यावर व विविध कार्यक्रमांना उपस्थित राहण्यावर उमेदवारांनी भर दिला.

 बारामती शहर व तालुक्यामध्ये सर्वच पक्षांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून प्रचार करण्यात आजचा संपूर्ण दिवस व्यतित केला. इतर कोणत्याही मोठ्या नेत्याची सभा दिवसभरात आयोजित केलेली नव्हती.
 प्रचार रॅलीद्वारे मात्र कोणाची ताकद मोठी हे दाखवण्यासाठी चढाओढ लागलेली होती. सायंकाळनंतर रात्री ८ वाजता पुणे जिल्ह्याचे पालक मंत्री गिरीष बापट यांची तर रात्री १० वाजता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची सभा होऊन बारामतीत दोन्ही पक्षांच्या प्रचाराची सांगता झाली.

राजकीय दंगल थांबली

 इंदापुरात हर्षवर्धन पाटील व अजित पवार यांच्या परस्परांवरील आरोप प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. दोघांनीही एकमेकांवर व्यक्तिगत आरोप केले होते. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी रविवारी (दि.१९) काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पारंपारिक प्रतिस्पर्धी पक्षांनी सभा घेऊन प्रचाराची सांगता केली. आठ दिवस सुरु असणारी भाषणबाजी, मतदारांच्या भेटी आज थंडावल्या.

'स्टार'ना पाहण्यासाठी झुंबड

 खेड तालुक्यात विविध उमेदवारांनी दिवसभर व्यक्तिगत गाठीभेटीवरच भर दिला. एका गटामध्ये उमेदवाराने त्याच्या प्रचारासाठी जय मल्हार फेम देवदत्त नागे याला स्टार प्रचारक म्हणून बोलावले होते. त्यांना पाहण्यासाठी गर्दी झाली होती. उमेदवारांना प्रचार रॅली काढून स्वत:चे महत्त्व त्या त्या गटात अधोरेखीत करण्याचा प्रयत्न केला. आमदार सुरेश गोरे यांनी कोपरा सभा घेऊन लोकांशी संवाद साधला. सायंकाळी साडेपाच नंतर मात्र प्रचाराची सांगता झाली.

मंचर तालुक्यामध्ये दिवसभर प्रचार रॅली काढून उमेदवारांनी गट-गणांत धुरळा उडवून दिला. सायंकाळी आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या सभेने राष्ट्रवादीने त्यांच्या प्रचाराची सांगता केली तर खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्या सभेने शिवसेनेच्या प्रचाराची सांगता झाली.

छुपा प्रचार सुरूच राहणार

दौंड तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा रविवारी थंडावल्या आहेत, तरीदेखील पुढील दोन दिवस छुपा प्रचार सुरू राहील, अशी एकंदरीत परिस्थिती आहे. दरम्यान उमेदवारांनी मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटींवर भर दिला आहे. ध्वनीक्षेपकावरील प्रचार बंद झाल्याने विचित्र आवाज, गाणी, ढोलताशांचा आवाज बंद झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. जाहीर सभांमधून आरोप प्रत्यारोप झाले विशेषता राष्ट्रवादी, रासपा, भाजपा, आरपीआय युती या पक्षांत आरोप-प्रत्यारोपांची जुगलबंदी होती. तालुक्यात प्रचार दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, अजित पवार, गिरीश बापट, सुप्रिया सुळे यांच्या सभा झाल्या. मात्र, या सर्व सभांमध्ये राजकीय ऊण्याधुण्या

ढोल ताशांना मागणी 
ग्रामीण भागामध्ये लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यासाठी अनेक उमेदवारांनी ढोल ताशेही मागवलेले होते. ढोल ताशांच्या गजरात, आमच्या उमेदवाराला विजयी करा अशा घोषणा देत सारे पक्ष कार्यकर्ते महत्त्वाच्या रस्त्यांवरून फिरत होते.

Web Title: Challenges given by power demonstrations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.