चॅट जीपीटी, कृत्रिम बुद्धिमत्ता यासारखी आव्हाने माणसासमोर उभी - डॉ. रघुनाथ माशेलकर
By श्रीकिशन काळे | Published: February 11, 2024 03:56 PM2024-02-11T15:56:31+5:302024-02-11T15:57:00+5:30
भारत आर्थिकदृष्टया इतर देशांच्या तुलनेत थोडा गरीब असला तरी तो मनाची श्रीमंती बाळगणाऱ्या लोकांमुळे श्रीमंत
पुणे : सध्या जग प्रचंड बदलत असून, तंत्रज्ञानाचा पगडा वाढतेाय. चॅट जीपीटी, कृत्रिम बुद्धिमत्ता यासारखी आव्हाने आपल्या समोर उभी आहेत. ही आव्हाने पेलण्यासाठी मनुष्य प्राण्यातील सहृदयता जागृत ठेवण्याचे काम 'चतुरंग'सारख्या संस्था पुढील अनेक वर्षे निभवतील यात शंका नाही. गेल्या पन्नास वर्षांचा त्यांचा प्रवास पाहिल्यास त्यांनी सांस्कृतिक पालकत्व निभावले आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही, असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ-संशोधक पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्राच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेल्या 'चतुरंग प्रतिष्ठान' या संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्ताने चतुरंग संस्थेची उभारणी आणि जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या सात मान्यवरांचा कृतज्ञता सन्मान डॉ. माशेलकर यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. प्रमुख वक्ते ‘जडण-घडणचे’ संपादक डॉ. सागर देशपांडे उपस्थित होते. समारंभात 'चतुरंग'चे पालक, हितचिंतक, मार्गदर्शक स्व.चारुकाका सरपोतदार, बुजुर्ग गायिका निर्मलाताई गोगटे, ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे, निवेदक सूत्रसंचालक सुधीर गाडगीळ, नाटककार सुरेश खरे, अभिनेते- दिग्दर्शक योगेश सोमण आणि नाट्यदर्पण रजनीचे सर्वेसर्वा स्व.सुधीर दामले यांचा सन्मान करण्यात आला. स्व.चारुकाका सरपोतदार यांच्याविषयीची कृतज्ञता किशोर सरपोतदार यांचा सन्मान करून, तर स्व.सुधीर दामले यांच्याविषयीची कृतज्ञता शुभांगी दामले यांचा सन्मान करून व्यक्त करण्यात आली.
डॉ. माशेलकर म्हणाले की, भारत आर्थिकदृष्टया इतर देशांच्या तुलनेत थोडा गरीब असला तरी तो मनाची श्रीमंती बाळगणाऱ्या लोकांमुळे श्रीमंत आहे. बदलाचे वारे वेगाने वाहत असताना आपली मूल्ये, समृद्ध परंपरा आणि संस्कृतीचे जतन झाले पाहिजे हे विसरता कामा नये. आज सुवर्णमोहोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या या संस्थेस अध्यक्ष , उपाध्यक्ष, खजिनदार आदी पदे नाहीत. सर्व कार्यकर्त्याच्या भुमिकेतून काम करतात याचा हार्वर्ड बिझनेस स्कूल मध्ये केस स्टडी म्हणून आवर्जून अभ्यास व्हावा.