जेजुरीत कुलदैवत खंडोबा देवाचा चंपाषष्ठी उत्सव: गडावरून काढण्यात आला तेलहंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2020 07:55 PM2020-12-19T19:55:00+5:302020-12-19T19:55:50+5:30
मंगळवारी (दि १५) मार्गशीर्ष प्रतिपदेला जेजुरी गडावर देवाची घटस्थापना होऊन देवाच्या उपासनेला सुरूवात झाली
जेजुरी: महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीच्या खंडोबा देवाचा चंपाषष्ठी उत्सव अतिशय धार्मिक वातावणात जेजुरी गडावर सुरु असून मार्गशीर्ष पंचमीला पारंपारिक पध्दतीने वाजत गाजत सायंकाळी गडावरून तेल हंडा काढून जेजुरी शहरात मानकरी व भाविकांनी अर्पण केलेल्या तेलाने श्री खंडोबा व म्हाळसा देवीला तेलवण करून हळद लावण्यात आली आहे.
मंगळवारी (दि १५) मार्गशीर्ष प्रतिपदेला जेजुरी गडावर देवाची घटस्थापना होऊन देवाच्या उपासनेला सुरूवात झाली. मार्गशीर्ष पंचमीला देवाला तेलवण व हळद लावली जाते. त्यानिमित्ताने शनिवारी (दि १९) सायंकाळी साडे सहा वाजता जेजुरी गडावरून गुरव,कोळी,वीर घडशी या पुजारी सेवक वर्गाच्या वतीने पारंपारिक पध्दतीने तेलहंडा काढण्यात आला. जेजुरी गडावर खंडोबा मंदिरा समोर या तेलहंड्याचे पूजन करून आरती करण्यात आली. तेल हंडा डोक्यावर घेवून, घडशी समाजाच्या वतीने सनई चौघडा वाजवीत मिरवणूक काढण्यात आली.यावेळी विश्वस्त,पुजारीसेवक वर्ग,मानकरी ग्रामस्थ देवसंस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.
जेजुरी गडावरून वाजत गाजत तेल हंडा गावाच्या चावडीत आणण्यात आला. चावडीत गावातील सर्व मानकऱ्यांचे नाव पुकारून हंड्यात तेल अर्पण करण्यात आले. मानाचे तेल अर्पण करून तेल हंडा गडावर नेण्यात आला. शेजारतीला मानकरी व भाविकांनी अर्पण केलल्या तेलाने देवाला अंघोळ घालण्यात आली. व श्री खंडोबा व म्हाळसा देवाला हळद लावण्यात आली.