चासकमानचे पाणी ‘ताप’तेय!

By admin | Published: April 10, 2017 02:20 AM2017-04-10T02:20:59+5:302017-04-10T02:20:59+5:30

चासकमान धरणाच्या डाव्या कालव्यातून खेडसह शिरूर तालुक्याला पाणी सोडल्याने चासकमान धरणाचा

Chamsamana water 'fever! | चासकमानचे पाणी ‘ताप’तेय!

चासकमानचे पाणी ‘ताप’तेय!

Next

चासकमान : चासकमान धरणाच्या डाव्या कालव्यातून खेडसह शिरूर तालुक्याला पाणी सोडल्याने चासकमान धरणाचा डावा कालवा तुडुंब भरून वाहत आहे. यामुळे चासकमान धरणाच्या पाणीपातळी घटत आहे. धरणामध्ये ३४.१७ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. शिल्लक पाण्याचे योग्य नियोजन करावे, अशी मागणी धरणाअंतर्गतच्या गावांतील नागरिकांनी केली आहे.
सध्या डेहेणे, वाडा, तिफनवाडी, दरकवाडी, गुंडाळवाडी, बुरसेवाडी आदी गावाअंतर्गत असलेला पाणीसाठा झपाट्याने कमी झाल्याने अंतर्गत गावांना एप्रिल महिन्यातच उन्हाळ्याच्या तीव्र झळा सोसाव्या लागत आहेत. हे आवर्तन सोडल्यामुळे धरणाखालील गावांचा पाणीप्रश्न मिटणार आहे. परंतु धरणाअंतर्गत असलेल्या गावांना मोठ्या प्रमाणात पाणी समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. (वार्ताहर)

डेहेणे, खरोशी, वाडा, तिफनवाडी, दरकवाडी, बुरसेवाडी आदी सह गावांच्या जमिनी धरणामध्ये गेल्याने या गावांना पाणीसमस्येला मोठ्या प्रमाणात सामोरे जावे लागत आहे. गावांतील महिलांना मैलोन्मैल फेब्रुवारी महिन्यापासून डोक्यावरून पाणी आणावे लागत आहे.

यावर्षी १८ टक्के जास्त
धरणामध्ये सद्या स्थितीत ३४.१७ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी याच तारखेला १६.८१ टक्के इतका होता. म्हणजे मागील वर्षीपेक्षा यावर्षी १८ टक्के जादा पाणीसाठा शिल्लक आहे.

पाणलोटमध्ये बंधारे बांधा
धरणाअंतर्गत गावांमध्ये प्रशासनाने छोटे-मोठे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे अधिक प्रमाणात बांधावे. यामुळे पाणी अधिक प्रमाणात अडून राहून पाणी साठवण क्षमता वाढेल, अशी मागणी नागरिक करत आहे.

४00 क्युसेक्सने पाणी पळविले; जातेगावच्या माजी सरपंचावर गुन्हा
केंंदूर : चासकमान कालव्यातून कारेगाव धानोरे शाखा कालव्यास सोडण्यात आलेले पाणी रात्रीच्या सुमारास शासकीय नियम व आदेशाचे उल्लंघन करून ४०० क्युसेक्स पाणी चोरी केल्याप्रकरणी जातेगाव खुर्दचे माजी सरपंच समाधान डोके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
याबाबत शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : चासकमान कालव्यामधून कारेगाव धानोरे या विभागासाठी पाणी सोडण्यात आले आहे. करंदी गावच्या हद्दीमध्ये पाणी सुरू असताना शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास जातेगाव खुर्दचे माजी सरपंच समाधान डोके व त्यांच्या सहकाऱ्यांनी कुलूप तोडून स्वत:च्या व सहकाऱ्यांच्या शेताला पाणी मिळावे या उद्देशाने ४०० क्युसेक्स पाणी चोरून नेले. याबाबत शिक्रापूर येथील चासकमान शाखा एकचे अधिकारी शंकर बसप्पा संतीकर यांनी शिक्रापूर पोलिसांत फिर्याद दिली आहे. माजी सरपंच समाधान डोके व साथीदारांवर कलम ३७९, ४२७, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुरेश कांबळे करत आहेत.
चासकमान धरणातून सोडण्यात येणारे पाणी ‘टेल टू हेड’ अशा स्वरूपात सोडण्यात येत असल्यामुळे प्रामुख्याने शिरूरच्या पश्चिम पट्ट्यातील गावांवर अन्याय होत आहे. या परिसरात चासकमानच्या धरणासाठी भूसंपादन मोठ्या प्रमाणात करण्यात आलेले होते; मात्र पाण्यासाठी आज याच भागाला शिरूरच्या पूर्व भागात प्रथम पाणी दिल्यानंतर, या परिसरातील शेतकऱ्यांना वाट पाहण्याची वेळ येत आहे. या भागातील करंदी, वाजेवाडी, जातेगाव खुर्द, वाजेवाडी, पिंपळे जगताप या गावांना कालव्यास पाणी असूनही दुष्काळी परिस्थिती सहन करावी लागत आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी आक्रमक झालेले आहेत. (वार्ताहर)

चासकमानचे पाणी सोडून सात दिवस झाले; मात्र जातेगाव खुर्दपर्यंत २०० क्युसेक्सनेच पाणी मिळत आहे. ४०० क्युसेक्स पाणीचोरीचा आरोप माझ्यावर व सहकार्यांवर करण्यात आलेला खोटा असून संबंधित अधिकारी शेतकऱ्यांवर अन्याय करत आहे.
- समाधान डोके,
माजी सरपंच, जातेगाव खुर्द


शासनाच्या निर्णयामुळे मागील वर्षी याच भागातील उसाचे खूप मोठे नुकसान या भागातील शेतकऱ्यांना सहन करावे लागले होते. यंदाही असाच प्रकार पुन्हा होत आहे. जमीन महसूल कायद्यातील कलम ७० /२ नुसार पाणी प्रथम याच भागात देणे अपेक्षित असल्याने संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आलेली आहे. त्यामुळे या भागातील करंदी, वाजेवाडी, जातेगाव खुर्द, वाजेवाडी, पिंपळे जगताप येथील शेतकरी आक्रमक झाले असून पाण्यासाठी मोठा लढा उभा करण्याच्या तयारीत आहेत.

Web Title: Chamsamana water 'fever!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.