कान्हेवाडीतर्फे चाकणला जपानी विद्यार्थ्यांची भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 11:09 PM2018-08-25T23:09:30+5:302018-08-25T23:09:49+5:30
प्रिन्सिपल यामादा आकिनोरी यांनी गावातील रस्ते, आरओ प्लांट, पाणीपुरवठा व्यवस्था, बंदिस्त गटर व घरे ग्रामीण भागात चांगली असल्याने त्यांना कान्हेवाडीत राहण्यास आनंद होईल व भारतात परत आल्यास कान्हेवाडी गावास पुन्हा भेट देण्याचा मनोदय व्यक्त केला.
चाकण : जपान येथील टोकियो शहरातील युकोबुनकान ग्लोबल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आदर्शगाव कान्हेवाडीतर्फे चाकण गावाला भेट दिली. गावातील विविध विकास योजना व ग्रामीण जीवन याची जवळून पाहणी केली. भारतातील ग्रामीण खेड्यातील विकास व ग्रामीण जीवन याचा अभ्यास त्यांनी केला.
प्रिन्सिपल यामादा आकिनोरी यांनी गावातील रस्ते, आरओ प्लांट, पाणीपुरवठा व्यवस्था, बंदिस्त गटर व घरे ग्रामीण भागात चांगली असल्याने त्यांना कान्हेवाडीत राहण्यास आनंद होईल व भारतात परत आल्यास कान्हेवाडी गावास पुन्हा भेट देण्याचा मनोदय व्यक्त केला. तानाका युता यांनी गावातील स्वच्छता, सांडपाणी व्यवस्था, ओला-सुका कचरा वर्गीकरण, घनकचरा व्यवस्थापनचे कामाबाबत समाधान व्यक्त केले. गावातील नागरिकांचे जीवनमान उंचविण्याकामी केलेल्या प्रयत्नाबद्दल ग्रामपंचायतीची प्रशंसा केली. इबिकी युवामतो या विद्यार्थिनीने जि.प. शाळेतील वर्गखोल्या, शैक्षणिक साहित्य, बोलकी अंगणवाडी, बाग-बगीचा पाहून कान्हेवाडी येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल असणार आहे असा विश्वास व्यक्त केला. यावेळी दुभाषक म्हणून श्रुती देशपांडे यांनी परदेशी पाहुण्यांना माहिती दिली. ग्रामपंचायती माहिती ग्रामविकास अधिकारी अरुण हुलगे यांनी दिली. ग्रामपंचायतच्या वतीने तुळशीचे रोप देऊन आलेल्या पाहुण्यांचे स्वागत सरपंच शांता येवले यांनी केले. गावात केलेली विविध विकास कामे देश व राज्यपातळीवरील अभियान राबविणेबाबत ग्रामस्थांचे लाभलेले सहकार्य व सोडविलेल्या अडी-अडचणीबाबत माहिती आदर्श सरपंच भाऊसाहेब पवार यांनी दिली. यावेळी ग्रामपंचायतीचे उपसरपंच राहुल येवले, ग्रा.पं. सदस्य विनोद येवले, कुंदा पवार, मीरा येवले, कल्पना कडलक, शिक्षक दादासाहेब खरात, शीतल म्हेत्रे, भाग्यश्री येवले, महादू येवले तसेच गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. विनोद येवले यांनी आभार मानले.
मिनामी ओगूची या विद्यार्थिनीने गाव, नदीघाट, स्मशानभूमी परिसर, शेतातील विविध पिके- ऊस, भात, फुलशेती-ग्लॅडीओ, गुलछडी, अस्टर, जरबेरा इत्यादी पाहून ग्रामीण भागातील शेती व शेतकरी यांची माहिती घेतली.