पुण्यात अतिवृष्टीची शक्यता; खासगी कंपन्यातील कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 07:01 PM2022-07-13T19:01:45+5:302022-07-13T19:01:55+5:30
सुरक्षेच्या दृष्टीने हे आवाहन करत असल्याचे महानगरपालिका प्रशासनाने सांगितले
पुणे : राज्यासहित पुणे जिल्ह्यात सर्वत्र पावसाने धुमाकूळ घातला आहे. गेल्या दोन दिवसांपासून पुणे शहर आणि ग्रामीण भागात मुसळधार पाऊस पडत आहे. हवामान विभागानेही पुण्याला रेड अलर्ट दिला आहे. तसेच हवामान विभागाने पुढील दोन दिवसात अतिवृष्टीची शक्यता वर्तवली आहे. अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असल्याने शाळांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पर्यटन स्थळांनाही नियम घालून देण्यात आले आहेत. त्यातच पावसामुळे शहराबरोबरच ग्रामीण भागातही दरड कोसळणे, झाडपडी, घरे कोसळणे, अपघाताच्या अशा घटना घडू लागल्या आहेत. त्यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे.
उद्यापासून दोन दिवस अतिवृष्टीची शक्यता वर्तवली असून त्याच अनुषंगाने आता पुणे पालिका प्रशासन देखील सज्ज झालेलं पाहायला मिळत आहे. पुणे महानगरपालिकेने शहरातील सर्वाच खासगी कंपनी आणि आयटी कंपन्यांना त्यांच्या कर्मचारी वर्गाला वर्क फ्रॉम होम देण्याच आवाहन केलं आहे . हवामान विभागाने उद्या आणि परवा पुणे जिल्ह्यात रेड अलर्ट जारी केला आहे, त्याच पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने हे आवाहन करत असल्याचे महानगरपालिका प्रशासनाने सांगितला आहे.
सिंहगड बंद ठेवा
पुण्यात सुरु असलेल्या पावसाचा अंदाज आणि पायथ्यापासून सिंहगडाकडे जाणाऱ्या ९ किमीच्या मार्गाला दरड कोसळण्याच्या शक्यतेमुळे पुणे वनविभागाने जिल्हा प्रशासनाला पत्र लिहून सिंहगड किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांना १६ जुलैपर्यंत बंदी घालण्याची विनंती केली आहे. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी, किल्ल्याला भेट देण्यास तात्पुरती बंदी आवश्यक आहे. असं वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. पुढील तीन दिवस पुणे जिल्ह्यासाठी हवामान विभागाने रेड अलर्ट दिलेला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी आता वनविभागाच्या या मागणीवर काय निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.