Weather News: कोकण, मध्य महाराष्ट्रात 'या' दोन दिवशी पावसाची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 09:05 PM2022-01-20T21:05:15+5:302022-01-20T21:05:22+5:30
कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामान तर काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे
पुणे : पश्चिमी प्रक्षोभामुळे उत्तर भारतात तसेच वायव्य भारतात सिस्टीम तयार झाली असून त्याचा परिणाम होऊन अरबी समुद्रावरुन येणाऱ्या वाऱ्याचा प्रभाव वाढणार आहे. त्यामुळे येत्या शनिवारी व रविवारी कोकण, मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान व हलक्या पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
याबाबत हवामान विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले की, उत्तर भारतात पश्चिमी प्रक्षोभ जाणवत असून त्यामुळे वायव्य भारतात, राजस्थानजवळ एक सिस्टीम तयार झाली आहे. त्याचा परिणाम होऊन अरबी समुद्राकडून येणारे आर्द्रतायुक्त वाऱ्याचा प्रभाव वाढणार आहे. कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात शनिवारी व रविवारी काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामान तर काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. पाऊस झाला तरी तो हलक्या स्वरुपाचा असणार आहे.
मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. तर विदर्भात बऱ्याच ठिकाणी घट झाली आहे. राज्यात सर्वात कमी किमान तापमान जळगाव येथे ९.७ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले आहे. २२ जानेवारी रोजी पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस किंवा गडगडाट होण्याची शक्यता आहे. २३ जानेवारी रोजी रत्नागिरी, सिंधुदुर्ग पुणे, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.