गणपती विसर्जनाला विजांच्या कडकडासह पावसाची शक्यता, मिरवणुकी पाहा छत्र्या घेऊन!
By नितीन चौधरी | Published: September 27, 2023 06:57 PM2023-09-27T18:57:53+5:302023-09-27T19:00:03+5:30
भाविकांनी विसर्जन मिरवणुकीत सहभागी होताना छत्र्या व रेनकोट सोबत ठेवावेत, असा सल्ला देण्यात आला आहे....
पुणे : गणेशोत्सवात पहिले आठ दिवस पावसाने उघडीप दिल्यानंतर शहरात मंगळवारी मात्र, जोरदार हजेरी लावली. त्यामुळे भाविकांच्या देखावे पाहण्याच्या उत्साहावर पाणी फिरले. शहरात बुधवारीदेखील ढगाळ वातावरण होते. भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, गुरुवारी अर्थात अनंत चतुर्दशीच्या दिवशी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच मध्यम ते तीव्र स्वरूपाच्या सरी देखील कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांनी विसर्जन मिरवणुकीत सहभागी होताना छत्र्या व रेनकोट सोबत ठेवावेत, असा सल्ला देण्यात आला आहे.
गणेशोत्सवात देखावे पाहण्यासाठी पुणेकर गर्दी करतात. पहिले आठ दिवस वरुणराजाने उघडीप दिल्याने गणेशोत्सवाचा आनंद चांगल्या पद्धतीने लुटता आला. मात्र, मंगळवारी झालेल्या जोरदार पावसामुळे भाविकांच्या उत्साहावर पाणी फिरले. मंगळवारी झालेल्या पावसामुळे शहरात गर्दीवर मोठा परिणाम झाला. बुधवारीसुद्धा दुपारी कडकडीत ऊन पडल्यानंतर सायंकाळी मेघांनी नभ आक्रमिले होते. त्यानंतर रात्री उशिरा पावसाला सुरुवात झाली. भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या अंदाजानुसार अनंत चतुर्दशीच्या दिवशी अर्थात गुरुवारी देखील हीच स्थिती राहणार आहे.
याबाबत हवामान अंदाज विभागाचे प्रमुख डॉ. अनुपम काश्यपी म्हणाले, ‘शहरात मध्यम स्वरूपाचा पाऊस (१५ ते ६५ मिमी दरम्यान) पडण्याची शक्यता आहे. दिवसभर ढगाळ वातावरण राहून दुपारी अधूनमधून ऊन पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर सायंकाळी काळ्या ढगांची (क्युमिलोनिंबस ढग) गर्दी होऊन मेघगर्जना व विजांच्या कडकडासह पावसाची शक्यता आहे. यासोबत सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. याच काळात मध्यम ते तीव्र स्वरूपाच्या काही सरी पडण्याची शक्यता आहे. यात १० ते ३० मिलिमीटर प्रतितास पाऊस होण्याची शक्यता असून ढगाळ वातावरणामुळे दृश्यमानातदेखील कमी होणार आहे. त्यामुळे भाविकांनी काळजी घेण्याची गरज आहे.”