कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:10 AM2021-01-04T04:10:41+5:302021-01-04T04:10:41+5:30
पुणे : उत्तर भारतात थंडीच्या कडाक्यापाठोपाठ अनेक ठिकाणी पावसाच्या सरी आल्याने तापमानात वाढ झाली आहे. महाराष्ट्रात पूर्वेकडून येणा-या वा-याचा ...
पुणे : उत्तर भारतात थंडीच्या कडाक्यापाठोपाठ अनेक ठिकाणी पावसाच्या सरी आल्याने तापमानात वाढ झाली आहे. महाराष्ट्रात पूर्वेकडून येणा-या वा-याचा जोर असल्याने अद्याप कडाक्याची थंडी पडली नाही. येत्या बुधवारी व गुरुवारी कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्यात रविवारी सर्वात कमी किमान तापमान ब्रम्हपुरी येथे १३ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.
उत्तर भारतात अनेक ठिकाणी रविवारी पावसाच्या सरी काेसळल्या. त्यामुळे गेले काही दिवस कडाक्याच्या थंडीचा अनुभव घेणा-या नागरिकांना आता पावसाचा सामना करावा लागला. महाराष्ट्रात पूर्वेकडून बंगालच्या उपसागराकडून येणार्या वा-याचा जोर अजूनही अधिक आहे. त्यामुळे राज्यात सध्या कडाक्याची थंडी अजून अनुभवायला येत नाही. मध्य महाराष्ट्रात तुरळक भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. विदर्भाच्या बऱ्याच भागात किमान तापमान सरासरीच्या तुलनेत ३ ते ४ अंशांनी वाढ झाली आहे.
४ व ५ जानेवारीला गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. ६ व ७ जानेवारी रोजी कोकणातील सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. ७ जानेवारी रोजी रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
राज्यातील प्रमुख शहरातील किमान तापमान (अंश सेल्सिअस) पुणे १४.७, लोहगाव १५.२, जळगाव १६.७, कोल्हापूर १७.४, महाबळेश्वर १४.९, मालेगाव १८.४, नाशिक १६.४, सांगली १६, सातारा १६.१, सोलापूर १६.२, मुंबई २१.२, सांताक्रुझ १९.७, रत्नागिरी १९.३, पणजी २१.८, औरंगाबाद १६.२, परभणी १४.५, नांदेड १५, अकोला १७.२, अमरावती १८.७, बुलडाणा १७, ब्रम्हपुरी १३, चंद्रपूर १३.६, गोंदिया १४.४, नागपूर १५.१, वाशिम १५.२, वर्धा १६.