कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात पावसाची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:27 AM2020-12-14T04:27:30+5:302020-12-14T04:27:30+5:30
पुणे : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम सोमवारपर्यंत जाणवणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी हलक्या ...
पुणे : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम सोमवारपर्यंत जाणवणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. निम्म्या विदर्भात सोमवारी अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
रविवारी सकाळी संपलेल्या २४ तासात राज्यात नंदूरबार ३७, शहादा, तळोदा २६, जळगाव ५, डहाणु ४ मिमी पावसाची नोंद झाली होती. याशिवाय कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी तर, मध्य महाराष्ट्रात बर्याच ठिकाणी पाऊस झाला.
अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यभरात गेल्या दोन दिवसांपासून सर्वत्र ढगाळ वातावरण दिसून येत आहे. त्याचा परिणाम राज्यातील थंडी कमी झाली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाच्या बर्याच भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत मोठी वाढ झाली आहे. कोकण, गोव्याच्या बहुतांश भागात किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे.
कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात सोमवारी तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. १५ ते १७ डिसेंबर दरम्यान गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.
पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यात १४ डिसेंबर रोजी तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. अकोला अमरावती, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.