राज्यात पुढील चार दिवस वादळी वार्यासह पावसाची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 08:36 PM2021-04-25T20:36:14+5:302021-04-25T20:36:47+5:30
मराठवाडा ते दक्षिण तामिळनाडू किनारपट्टीपर्यंत निर्माण झाले कमी दाबाचे क्षेत्र
पुणे: मराठवाडा ते दक्षिण तामिळनाडू किनारपट्टीपर्यंत निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र अजूनही कायम असून त्यामुळे मध्य महाराष्ट्रासह राज्यात पुढील चार दिवस वादळी वार्यासह तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
रविवारी राज्यात सर्वाधिक कमाल तापमान ब्रम्हपुरी येथे ४३.३ अंश सेल्सिअस तर सर्वात कमी किमान तापमान पुणे येथे १९.६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे. कोकण गोव्याच्या बर्याच भागात तर विदर्भाच्या तुरळक भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असल्याने राज्यात सध्या अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण दिसून येत आहे.
कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात २७ व २८ एप्रिल रोजी वादळी वार्यासह पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर तसेच मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी २६ ते २९ एप्रिल रोजी वादळी वार्यासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. अहमदनगर, पुणे, बीड जिल्ह्यात २७ ते २९ एप्रिल दरम्यान मेघगर्जनेसह वीजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया जिल्ह्यात तुरळक ठिकाणी २८ व २९ एप्रिल रोजी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.